अमरावती; पुढारी वृत्तसेवा
अमरावतीत कोरोनाचा पुन्हा एक नवीन व्हेरीयंट (B.1.606) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढविणारा ओमायक्रॉन, डेल्टासह आणखी एका नवीन व्हेरियंटची भर पडली आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना हा नवीन व्हेरियंट आढळून आला. कॅनडा तसेच यूएसमध्ये देखील हा व्हेरियंट आढळून आल्याची माहिती आहे. नवीन व्हेरीयंटमुळे संक्रमणात भर पडू नये म्हणून नागरिकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे.
अमरावतीत सद्यस्थितीत कोरोना विषाणूचे तीन जेनेटिक म्यूटेट स्ट्रेन अॅक्टीव्ह असल्याचे दिसून येत आहे. आफ्रिका खंडातून ओमायक्रॉन सर्वप्रथम आढळून आला असला, तरी युगांडा येथून आलेले दाम्पत्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला होता. सोबतच डेल्टाचे देखील ३ रुग्ण अमरावतीत आढळून आले आहे. सोबतच जिनोम सिक्वेंसिंग दरम्यान पुन्हा B.1.606 हा नवीन व्हेरियंट आढळून आला. नवीन व्हेरीयंट धोकादायक नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत E484K हा नवीन प्रकारचा म्युटंट स्ट्रेन आढळून आला होता. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरालॉजीने (एनआयव्ही) फेब्रुवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब केले होते. सुरूवातीला कोरोना संक्रमणाच्या १० महिन्यानंतर अमरावतीत प्रथमच जनुकीय बदल आढळून आला होता. E484K हा नवीन प्रकारचा स्ट्रेन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कोरोना लॅबमध्ये हा स्ट्रेन बुधवार १७ फेब्रुवारी आढळून आला होता.
जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर कोरोना संक्रमण वाढण्यास सुरूवात झाली. २ जानेवारीला १० तर ३ जानेवारीला ६ रुग्ण असलेली संख्या सद्यस्थितीत दररोज १०० च्या आपपास रुग्ण आढळून येत आहे. ११ जानेवारीला तब्बल ९१ रुग्ण आढळून आले. अमरावतीत आलेल्या दुसऱ्या लाटेत हॉस्पीटलमध्ये बेड मिळणे कठीण झाले. मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार करावे तरी कोठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.
नवीन व्हेरियंट आढळला
कोरोनाचा B.1.606 हा नवीन व्हेरियंट नमून्यांमध्ये आढळून आला आहे. यासारखे व्हेरियंट यूएस आणि कॅनडामध्ये देखील आढळून आले आहेत. नवीन व्हेरियंट धोकादायक नाही. व्हेरियंट असलेले एकूण ७ नमुने आढळून आले. त्यामध्ये ३ डेल्टा व्हेरियंटचे देखील रुग्ण आहेत. ओमायक्रॉन, डेल्टा प्रमाणे नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. पुन्हा १७ नमुने जिनोम सिक्वेसिंग करिता पाठविण्यात आले आहेत.
– डॉ. प्रशांत ठाकरे, समन्वयक, जिनोम सिक्वेंसिंग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा
हे ही वाचलं का ?