Latest

Omicron : ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण देशात नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप देशात आढळून आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.

'ओमायक्रॉन' (Omicron) व्हेरियंट जगातील १४ देशांत आढळून आला आहे. या व्हेरियंट विषयी अधिक अभ्यास केला जात आहे. अद्याप देशात या व्हेरियंटचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असेही त्यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने एक ॲडवायजरी जारी केली आहे. एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास तातडीने त्याची तपासणी करावी आणि संबंधित रुग्णाची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बोत्सवानामध्ये सर्वांत आधी ओमिक्रॉन व्हेरियंट (omicron) आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचे जिनोम सिक्‍वेन्सिंग सर्वांत आधी करण्यात आले. ते करणार्‍या संशोधकांनीच या व्हेरियंटला 'बी. 1.1.529' हे नाव दिले होते. संशोधक चमूतील अँजेलिक कोईट्झी यांनीच जगाला सर्वांत आधी या व्हेरियंटबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे. अँजेलिक यांनी आता जगाला उद्देशून या व्हेरियंटबद्दल नाहक भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉनआधी आढळलेल्या व्हेरियंटची लागण या तुलनेत बर्‍यापैकी जास्त तापदायक होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशा रुग्णांमध्ये या व्हेरियंटची लक्षणे सौम्य होतीच, ज्यांनी लसच घेतलेली नाही, अशा ओमिक्रॉन रुग्णांमध्येही लक्षणे सौम्यच होती, असे अँजेलिक कोईट्झी यांनी म्हटले आहे.

रोममधील बॅम्बिनो गेसू रुग्णालयातर्फे कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरियंटचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. इटलीतील एका संशोधकाने ते तयार केले आहे. थ्री-डी छायाचित्रातून 'डेल्टा' आणि 'ओमायक्रॉन' व्हेरियंटमध्ये म्युटेशन्सच्या (बदल) बाबतीत तुलनाही करण्यात आली. मानवी पेशीच्या हिशेबाने स्वत:त अधिकाधिक अनुकूल बदल करण्यात आजवर आढळलेल्या व्हेरियंटस्मध्ये 'ओमायक्रॉन' अव्वल ठरला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भंगार विकत ते बघतायत मुलांना हिंदकेसरी बघण्याचे स्वप्न | Story of Wrestlers

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT