पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ( World Boxing Championship ) भारताला तिसरे पदक मिळाले आहे. निखत जरीनने ५० किलो गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली. अंतिम फेरीत निखित हिने दोनवेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम हिचा ५-० असा पराभव केला. महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निखितचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.
शनिवारी ( दि. २५) नीतू घनघासने ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर स्वीटी बुरा हिने ८१ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. स्वीटीने चीनच्या लिना वॉन्गचा ४-३ असा पराभव केला होता.
अंतिम फेरीत निखतकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. तिनेही देशवासीयांच्या अपेक्षा वास्तवात उतरवल्या. अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तिने पहिल्या फेरीत ५-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही ही आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम बॉक्सरवर जोरदार ठोसा लगावला. पंचांनी व्हिएतनामी बॉक्सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. याचवेळी निखतचा विजय निश्चित झाला होता. अखेरीस तिने ५-०च्या फरकाने सामना जिंकला. आणि सलग दुसऱ्यांदा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली.
हेही वाचा :