पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान येथून फरार झाल्यानंतर पुण्यातील इसिस मोड्यूलसाठी काम करणारे रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केल्यानंतर सध्या तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) या गुन्ह्यातील फरार असलेल्या चारही आरोपींवर तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मोहम्मद शहनवाज ऊर्फ शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि तालाह लियाकत खान अशी तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यातील मोहम्मद शहनवाज याला पुणे पोलिसांनी पकडले होते. मात्र, या वेळी पोलिसांना गुंगारा देत त्याने धूम ठोकली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौघांवरही बक्षीस ठेवण्यात आलेली असून, दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी त्यांचा पाहिजेत या यादीत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून या मॉडेलचा सखोल तपास करत आहेत. राजस्थान येथील स्फोटके बाळगल्याच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते.
मात्र त्यातील एक दहशातवादी कारवाई दरम्यान पळून गेला. अटकेतील मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी तपासात धक्कादायक खुलासे झाले. त्यांनी जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्याचे निष्पन्न झाले. पुढे गुन्ह्याची व्याप्ती पाहता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) गुन्ह्याचा तपास आपल्याकडे घेतला. दहशतवाद्यांना अटक केल्यापासून तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुण्यातील या गुन्ह्यात लक्ष ठेवून होती.
दहशतवाद्यांना आश्रय देणार्या अब्दुल दस्तगीर पठाणला एटीएसने अटक केली. पुढे त्यांना आर्थिक रसद पुरविणार्या व इंजिनिअर असलेल्या समिब काझीला रत्नागिरी येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडील तपासामध्ये इसीससोबतचे कनेक्शन समोर आले.
एटीएसने याप्रकरणात इसिस प्रकरणात पकडलेल्या जुल्फीकार बडोदावालाला अटक केली. एटीएसच्या तपासादरम्यान आरोपींचा देशात विविध ठिकाणी मोठ्या घातपाताचा कटही उघड झाला.
मात्र गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने एटीएसकडून एनआयएने गुन्हा आपल्याकडे वर्ग करत तपास सुरू केला आहे. त्यांच्याकडील तपास प्रगतीपथावर असून त्यांनी नाचन नावाच्या एकाला बॉम्ब बनविण्यात इम्प्रूव्ह व्हाईज डिवाईस बनविण्याशी संबंधावरून नुकतीच अटक केली होती. राजस्थान येथील गुन्ह्यात फरार असलेल्या मोहम्मद साकी आणि मोहम्मद इम—ान खान यांना एनआएने अटक केली असून त्याच्याकडे तपास करत आहेत. याच इसिसच्या पुणे मोड्युलशी संबंधित प्रकरणात आता एनआएने चौघांना फरार घोषीत करत त्यांच्यावर तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
हेही वाचा