नगर, पुढारी वृत्तसेवा: नगरोत्थान योजनेतून भोसले आखाड्यात 23 कोटीचे पाच मजली सुसज्ज हॉस्पिटल उभारणीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर शंभर बेडचे हे अद्ययावत रुग्णालय उभे राहणार आहे. स्टिल, सिमेंटचे दर वाढल्याने ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने त्याच्याशी चर्चा करत निविदेपेक्षा 4 टक्के वाढीव दराची शिफारस केली, स्थायी समितीमध्ये आज तिला मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी समितीची सभा झाली. समिती सदस्य नगरसेवक गणेश कवडे, विनीत पाऊलबुद्धे, मुद्दसर शेख, रवींद्र बारस्कर, रुपाली वारे, वंदना ताठे यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. सभेसमोर सहा विषय ठेवण्यात आले होते. त्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान बुरूडगाव रस्त्यावरील भोसले आखाड्यात दोन एकर जागेवर नवीन सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 23 कोटी 84 लाख रुपयांचा निधी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडून मंजूर करू आणला आहे.
प्रस्तावित हॉस्पिटलची जागा शाळेसाठी आरक्षित होती. त्या जागेवर व्यायामशाळा असून, ती मोडकळीस आल्याने निर्लेखित करण्यात आली आहे. त्यामुळे त्या जागेवर आता 100 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यातील तीस टक्के रक्कम महापालिका देणार असून, उर्वरित 70 टक्के रक्कम शासन देणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती.
मात्र, ठेकेदाराने आगाऊ रकमेने निविदा भरल्याने ठेकेदारांशी महापालिका अधिकार्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर वाढीव 9 टक्क्याऐवजी 4 टक्क्याने काम करण्यास ठेकेदार तयार झाला आहे. दोन वर्षात हॉस्पिटलचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या निविदेला स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली.
राज्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात आरोग्य विभागाने काय दक्षता घेतली आहे, असा प्रश्न सभापती कुमार वाकळे यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, की शहरात दररोज दररोज 60 ते 70 रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार कोविड सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.
सभापती वाकळे यांनी ऑक्सिजन प्लँटबाबात विचारणा केली. यांनी महापालिकेने ऑक्सिजन प्लँट उभा केला आहे. मात्र, अद्याप ऑक्सिजन निर्मिती करण्यात आलेली नाही. ऑक्सिजन निर्मितीसाठी शासनाकडे परवानगी मागितली असून, येत्या पंधरा दिवसांत परवागी घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येईल, असे उत्तर गणेश गाडळकर यांनी दिले.
आ. जगताप यांच्या अभिनंदनाचा ठराव
नगरोत्थान योजनेतून आमदार जगताप यांनी बुरूडगाव येथे नव्याने उभारण्यात येणार हॉस्पिटलसाठी 23 कोटींचा निधी आणल्याबद्दल स्थायी समितीमध्ये नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली.