पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ नागपूर संचालित ताथवडे (पुणे) येथील वळू माता प्रक्षेत्रात बाह्यफलन व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत (ईटी-आयव्हीएफ लॅब) भ्रूण प्रत्यारोपणाच्या साहाय्याने फ्रिजवाल जातीच्या पहिल्या वासराचा जन्म झाल्याची माहिती महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.
देशी व संकरित गायींमध्ये आनुवंशिक सुधारणा करून उच्च वंशावळ असणार्या पशुधनाची संख्या जलद गतीने वाढविण्याच्या उद्देशाने सन 2017-18 मध्ये तत्कालीन पुणे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत एप्रिल 2021 पासून पंढरपुरी म्हैस व फ्रिजवाल गायीमध्ये बाह्य फलनाद्वारे भ्रूणनिर्मिती व भ्रूण प्रत्यारोपणाचे काम पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. पी. सांगळे, डॉ. विष्णू जवणे, डॉ. राजू कोलते, डॉ. हरिश्चंद्र अभ्यंकर, डॉ. अमोल आहेर, शितोळे, शेलार आदींच्या सहभागाने केले आहे. या प्रयोगातून यशस्वीरीत्या वासरू जन्माला आले आहे. त्यामुळे या टीमचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
या भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रोत्साहन मिळाले आहे. या कार्यक्रमावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, डॉ. शिवाजी पवार यांनी प्रशासकीय पातळीवर सहकार्य केले. आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत उच्च दुग्धक्षमतेचे गोधन तयार करणे शक्य आहे. तरी या तंत्रज्ञानाचा फायदा पशुपालकांना करून देण्यासाठीचे नियोजन महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. पशुपालकांच्या दारामध्ये जास्तीत जास्त दूध देणार्या उच्च वंशावळीची वासरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाचे असल्याचेही डॉ. परकाळे यांनी सांगितले. सहिवाल व होस्टन फ्रिजिन जातीमध्ये संकर करून केंद्र सरकारने फ्रिजवाल गाय विकसित केली आहे. त्यामध्ये बाह्यफलणाद्वारे फ्रिजवाल जातीच्या वासराचा जन्म झाल्याचे डॉ. राजू कोलते यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाने गायीच्या बीजांड कोशातून स्त्रीबीज काढून त्यांना प्रयोगशाळेत परिपक्व करून त्यांचे फलन केले जाते. त्यानंतर इन्क्युबेटरमध्ये फलित स्त्रीबीज सात दिवस ठेवून ऋतुचक्राचे नियमन केलेल्या गायीच्या गर्भाशयामध्ये सात दिवसांचे भ्रूण प्रत्यारोपित केले जाते. या तंत्रज्ञानाच्या वापरातून ताथवडे येथील वळू माता प्रक्षेत्र येथे फ्रिजवाल वासराचा जन्म होतो.