Latest

Nepal Earthquake | नेपाळमधील भूकंपबळींचा आकडा १४० वर, नलगाड पालिकेच्या उपमहापौरांचाही मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : नेपाळच्या पश्चिम भागात जाजरकोट येथे शुक्रवारी रात्री ६.४ तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे मोठी जीवितहानी झाली असून मृतांचा आकडा १४० वर गेला आहे. तर या घटनेत तितकेच लोक जखमी झाले. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जाजरकोटमधील नलगाड नगरपालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह यांचाही या भूकंपात मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Nepal Earthquake)

कर्णाली प्रांताचे पोलीस प्रमुख डीआयजी भीम धाकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत नलगाड नगरपालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह यांचे निधन झाले आहे. त्याचे पालिका मुख्यालयाच्या निवासस्थानी वास्तव्य होते. सरिता सिंह ह्या नेपाळी काँग्रेस पक्षातून निवडून आल्या होत्या. (Earthquake News)

संबंधित बातम्या 

नेपाळमधील २०१५ नंतरचा हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे. ज्यामध्ये देशातील सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि २२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

नॅशनल भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरच्या माहितीनुसार, काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे ५०० किमी अंतरावर असलेल्या जाजरकोट जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची नोंद रात्री ११:४७ वाजता झाली.

या नैसर्गिक आपत्तीनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी बाधित लोकांची जाजरकोटमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांना आधार दिला. जाजरकोट आणि पश्चिम रुकूममध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या जाजरकोटमध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे, असे जाजरकोट जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक संतोष रोका यांनी सांगितले, असे द काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (earthquake today nepal 2023)

भूकंपाचे धक्क्याच्या भीतीने अनेकांनी उघड्यावर रात्र काढली. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लोक रात्रभर धडपडत होते. (Nepal Earthquake)

नेपाळमधील ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्येही जोरदार हादरे जाणवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, बिहारमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणा, कटिहार, पूर्व चंपारण, दरभंगा, मुझफ्फरपूर, पश्चिम चंपारण, सासाराम, नवादा आणि भारत-नेपाळ सीमेवरील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (earthquake today in nepal)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT