Latest

Neonatal Illness : नवजात बाळाचे आजारपण; जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

backup backup

Neonatal Illness : वातावरण व तापमान यातील बदल यांच्याशी जुळवून घेणे नवजात अर्भकासाठी आव्हान असते. बाळ जन्माला आल्यावर त्याची विशेष व योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. त्यातही कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या बाळांचीही पालकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे पालकत्त्व हे किती कठीण आणि गुंतागुंतीचे काम आहे, हे बाळ झाल्यानंतर समजते. बाळ वाढवणे ही कला पायर्‍या पायर्‍यांनीच शिकता येते. एका दिवसात आपण पालक म्हणून तज्ज्ञ होऊच शकत नाही. आपले बाळ छान, व्यवस्थित असल्याचे ओळखणे ही कलाच आहे. कारण, बाळ हरेक गोष्ट रडूनच सांगत असते. जेव्हा बाळाला काही होत असते किंवा ते आजारी असते तेव्हा काही लक्षणे दिसतात ती समजून घेतल्यास वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा, हे समजू शकते.

Neonatal Illness : रडणे ः लहान बाळे बहुतेक गोष्टी रडूनच सांगतात. त्यांना भूक लागली, झोप आली, शी किंवा शू केली तरी ते रडतात; पण हे रडणे आणि बाळाला काही होत असेल तर तेव्हाचे बाळाचे रडणे यात फरक असतो. नेहमीच्या रडण्यापेक्षा ते वेगळे असते असे तज्ज्ञही सांगतात. बाळाला काही त्रास होत असेल, तर नेहमीपेक्षा वेगळे आणि जोरजोरात रडते. बाळ हुंदके देत रडते. असे रडणे हे बाळाला ताप येणे, डोके दुखणे किंवा मेनिजायटीस असल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणे जरुरीचे असते.

अन्न घेण्यास नकार ः बाळाला बरे नसल्यास ते अन्न व्यवस्थित घेत नाही. बाळ दूध पित नसेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम.
कधी कधी बाळाच्या नाळेची किंवा बेंबीची जागा लाल होते किंवा कधी तरी त्यातून रक्त येऊ लागते त्यावेळी अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांकडे जा.

Neonatal Illness सर्दी ः आपल्या बाळाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सर्दी झाली असेल, त्याच बरोबर त्याला सतत खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

ताप ः बर्‍याचदा लहान मुलांना ताप येत असतो. वातावरणातील बदलामुळेही ताप येत असतो; पण बाळाला येणारा ताप थर्मामीटरने मोजला पाहिजे. तीन महिन्यांपेक्षा लहान बाळांना ताप येत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. बाळ तीन ते सहा महिने वयाचे असेल आणि त्याला 102 अंश फॅरेनहाईट इतका ताप येत असेल आणि बाळ किरकिर करत असेल किंवा मलूल झाले असेल, तर डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे.

Neonatal Illness डायरिया ः डायरिया हा मुलांमध्ये जीवघेणा ठरू शकतो. बाळाला दिवसातून सहा वेळा पाण्यासारखे जुलाब झाले किंवा जुलाबातून रक्त पडत असेल, तर ही स्थिती गंभीर असू शकते. त्यामुळे बाळाला लगेचच डॉक्टरांना दाखवा.

उलट्या ः बाळ कधीतरी प्यायलेले दूध थोडेसे उलटून काढते, त्यात विशेष घाबरण्यासारखे नसते; पण बारा तासांत बाळाला उलटी होत असेल आणि तापही आला असेल किंवा जुलाबही होऊ लागले, तर डॉक्टरचा सल्ला घ्या.

Neonatal Illness : पाण्याची कमतरता ः सहा तासांत बाळाला शू होत नसेल, तर बाळाच्या शरीरातले पाणी कमी झाले असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला डॉक्टरकडे न्या. त्याशिवाय बाळाची टाळू खोल जाणे, रडले तरी डोळ्यातून पाणी न येणे किंवा तोंड कोरडे पडणे यासारखी लक्षणे म्हणजे बाळाच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे लक्षण असते.

पुरळ येणे ः बाळाला पुरळ येणे दुर्लक्षित करू नका. पुरळ येण्याबरोबर ताप येत असेल किंवा घसा दुखत असेल किंवा जुलाब होत असतील तर वेळीच डॉक्टरला दाखवणे योग्य. बाळाचे रडणे समजून घेऊन त्याला योग्य वेळी डॉक्टरकडे नेणे आणि औषधे देणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बाळाचे नेहमीचे आणि त्रास होत असतानाचे रडणे यातला फरक लक्षात घ्यायला हवा. आई-बाबा झाल्यावर तो कळायला लागतो; पण त्यासाठीही कान सरावायला हवेत.

Neonatal Illness : श्वास घेताना त्रास होणे ः आपल्या बाळाला श्वास घेताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या. श्वास घेण्यास त्रास होण्याची काही लक्षणे असतात, ती लक्षात घेतली पाहिजेत. नेहमीपेक्षा बाळ भरभर श्वास घेत असेल. ओठावर किंवा त्वचेचा रंग निळसर होत असेल. बाळाने श्वास घेतल्यानंतर पोट आणि छातीच्या मधील स्नायू आत खेचले जात असतील. बाळ श्वास सोडताना कण्हत असेल किंवा आवाज काढत असेल. नाकामध्ये सर्दी अडकल्याने श्वास घेताना शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येत असेल आणि नाक स्वच्छ केल्यानंतर तो आवाज बंद होत असेल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT