

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 20 मिनिटांत 30 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातील 1000 हून अधिक खडे काढण्यात लॅप्रोस्कोपिक आणि सर्जन डॉ. शशांक शहा यांना यश आले. महिलेची नुकतीच प्रसूती झाल्याने खडे काढण्यासाठी लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी या शस्त्रक्रियेची निवड करण्यात आली. महिलेला गरोदर अवस्थेपासूनच ओटीपोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. तपासणीअंती पित्ताशयात खडे तयार झाल्याचे निदर्शनास आले. प्रसूती झाल्यामुळे पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्रास सतत जाणवू लागल्याने रुग्णाने उपचारांसाठी डॉ. शशांक शहा यांच्याकडे धाव घेतली.
रुग्णाला पित्ताचे खडे झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास वाढू लागला होता. सोनोग्राफीतून पित्त- मूत्राशयाच्या भागात पित्ताशयाचे खडे जमा झाल्यामुळे अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात आले. रुग्णास बाळाला नियमित स्तनपान करावे लागत असल्याने अॅडमिट होणे शक्य नव्हते. शस्त्रक्रिया अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण झाली. रुग्णाला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत आणि शस्त्रक्रियेनंतर 20 तासांच्या आत घरी सोडण्यात आले.
कोणती लक्षणे आढळतात?
पित्ताचे खडे पित्त आणि मूत्राशयाच्या पोकळीत तयार होतात. आंबटपणा, जेवणानंतर पोटात गोळा येणे, मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थांमुळे पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा गॅस अशी लक्षणे जाणवतात. रक्तातील कोलेस्टेरॉल, जास्त चरबीयुक्त आहार, आनुवंशिकता, मधुमेह, बैठी जीवनशैली, हार्मोनल बदल आणि लठ्ठपणा या कारणांमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. भारतीय लोकसंख्येमध्ये पित्ताचे खडे होण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
– डॉ. शशांक शहा