Latest

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

रणजित गायकवाड

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात (cruise party) चौकशी सुरु असतानाच मुंबई झोनचे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) व्यक्तिगत आयुष्यातील आरोपांमुळे रडारवर आले आहेत. मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) यांनीही अनेक आरोप केले आहेत. तसेच एनसीबी (NCB) पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या सनसनाटी खंडणी आरोपानंतर वानखेडे यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागण्याची चर्चा जोरात सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारकडे क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण आणि खंडणी प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी करावी याची मागणी सुरू केली आहे. वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणाचा तपास करत आहेत, अशावेळी एसआयटीची गरज काय? तसंच चौकशी करायची असेल तर सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केल्याचे समजते आहे.

अटकेची गरज भासल्यास ७२ तास आधी नोटीस द्या : न्यायालय

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एसीबीविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. तसेच जर चौकशीत अटकेची गरज भासल्यास किमान तीन दिवस (७२ तास) आधी नोटीस द्या, असेही न्यायालयाने स्पष्ट करून याचिका निकाली काढली.

प्रभाकर साईल, ऍड. सुधा द्विवेदी, ऍड. कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी आहेत. वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी राज्याकडून SITची स्थापन करण्यात आली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

एनसीबीकडून चौकशी….

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनुसार एनसीबीच्या पाच सदस्यीय पथकाने एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.

मुलगा आर्यन याला सोडण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोपासह पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार एनसीबी महासंचालकांनी नेमलेले पाच सदस्यांची समिती पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या आरोपांची चौकशी करत आहे.

दरम्यान, या चौकशीनंतर समीर वानखेडे यांची बदली होणार की त्यांना या प्रकरणातून बाजूला केले जाणार? याची चर्चा रंगली होती. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी काल चौकशीनंतर बोलताना माहिती दिली. समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून क्रुझवरील ड्रग्ज केस प्रकरणातील ज्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती त्यांनी ती सादर केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची भविष्यातही चौकशी करण्यात येईल, अशीही सिंह यांनी माहिती दिली.

NCB ला तपासासाठी हवी ती मदत करण्यासाठी तयार असल्याची भूमिका नवाब मलिक यांनी घेतली आहे. एनसीबीने आपल्याकडे या प्रकरणात काही माहिती मागितली तर करणार असल्याचं सांगितलं आहे. असं असतानाच आता समीर वानखेडे यांना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. सध्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT