भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI)ने आज (दि.१५) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात ऐतिहासिक भोजशाळेचा १५१ पानांचा सर्वेक्षण अहवाल सादर केला.  File Photo
राष्ट्रीय

मोठी बातमी : धार भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल उच्‍च न्‍यायालयात सादर

'पुरातत्त्‍व'च्‍या दाेन हजार पानी अहवालातून होणार मोठे खुलासे, २२ रोजी पुढील सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI)ने आज (दि.१५) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात ऐतिहासिक भोजशाळेचा दाेन हजार पानांचा सर्वेक्षण अहवाल सादर केला. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.

तीन महिन्यांच्या सर्वेक्षणानंतर होणार मोठा खुलासा

११ मार्च रोजी इंदूर उच्च न्यायालयाने 'एएसआय'ला भोजशाळेच्या ५०० मीटरच्या परिघात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. २२ मार्चपासून सुरू झालेले सर्वेक्षण २७ जूनपर्यंत चालले. या ९८ दिवसांच्या सर्वेक्षणात अनेक उत्खनन करण्यात आले, त्याची छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीही करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) चीही मदत घेण्यात आली आहे.

उत्खननात सापडलेल्या पुरातन वास्तूंमध्ये ३७ शिल्पे

ASI चे अतिरिक्त महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले. या काळात उत्खननात 1700 हून अधिक पुरातन वास्तू सापडल्या. यामध्ये 37 देवी-देवतांच्या मूर्तींचाही समावेश आहे. उत्खननात सापडलेली सर्वात खास मूर्ती म्हणजे माँ वाग्देवीची खंडित मूर्ती. भोजशाळा मुक्ती यज्ञ समन्वयक गोपाल शर्मा आणि याचिकाकर्ते आशिष गोयल यांनी सर्वेक्षणाबाबत मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेल्या पुरातन वास्तूंवरून हे सिद्ध होते की, भोजशाळा हे मंदिर होते. ते म्हणाले की, आतापर्यंत उत्खननात सापडलेल्या पुरातन वास्तूंमध्ये 37 शिल्पे आहेत. यामध्ये भगवान कृष्ण, जटाधारी भोलनाथ, हनुमान, शिव, ब्रह्मा, वाग्देवी, भगवान गणेश, माता पार्वती, भैरवनाथ इत्यादी देव-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.

काय आहे 'भोजशाळा' वाद?

धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

इतिहास काय सांगतो?

धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोज यांनी येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर 'भोजशाळा' म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली. 1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली. ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.

हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की( ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.

धार संस्थानाने भोजशाळेला केले हाेते संरक्षित स्मारक म्‍हणून घोषित

1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर या परिसरात मंगळवारी पूजा करण्‍यास तर शुक्रवारी नमाज अदा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT