नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजप आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी भेट घेतली. आगामी बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीच शेलार त्यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान शहा यांची भेट घेणार होते. पंरतु, शहा यांच्याकडून भेटीची वेळ न मिळाल्याने ही भेट होवू शकली नव्हती.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच साखरेच्या मुद्यांवर अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत येण्यासाठी पर्यायांचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींकडून केला जात आहे का? अशी चर्चा रंगली होती.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळेही चर्चेला वेग आला आहे.
सोमवारी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक नवीन महाराष्ट्र सदनात बोलावण्यात आली आहे. बैठकीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचे मंत्री अमित शहा यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचाही आढावा घेण्यात येईल.
सदर बैठकीस देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. फडणवीस आपल्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव, ज्योतिरादित्य शिंदे तसेच इतर मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस तत्काळ दिल्लीला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आधीच आशिष शेलार दिल्लीत आहेत. त्यात चंद्रकांत पाटलांचा नियोजित चार दिवसांचा दिल्ली दौरा आहे.
अशा परिस्थितीत भाजपचे तीन बडे नेते दिल्लीत भेटीगाठी घेत असल्याने राज्याचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. ते चार दिवस दिल्लीत असतील. पक्ष संघटनेच्या कामानिमित्त ते दिल्लीत असतील.
पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यात पक्षवाढीबरोबर आगामी मनपा निवडणुकांच्या दृष्टीने मनसे युतीबाबत चर्चा होऊ शकते.
चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. पाटील स्वत: राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी गेले होते. तेथे दोघांची बैठक झाली होती.
भेटीदरम्यान राजकीय चर्चा झाली पण भाजप-मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे पाटील यांनी सांगितले होते.
हे ही वाचलं का?