राष्ट्रीय

Delhi University Elections : ‘विद्यार्थी-GenZ’ने राहुल गांधींचे स्वप्न धुळीस मिळवले! दिल्ली विद्यापीठात ABVPचा दणदणीत विजय

NSUI ला केवळ एक जागा

पुढारी वृत्तसेवा

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या (DUSU) २०२५ च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमुळे राहुल गांधी यांचे तरुण, विद्यार्थी आणि Gen-Z पिढीला आकर्षित करण्याचे स्वप्न भंगले आहे. ‘डूसू’ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)ने उत्कृष्ट कामगिरी करत चारपैकी तीन पदांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

अध्यक्षपदावर एबीव्हीपीच्या आर्यन मान याचा विजय झाला आहे. त्याला एकूण २८,८४१ मते मिळाली, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या जोश्लिन नंदिता चौधरीला केवळ १२,६४५ मतांवर समाधान मानावे लागले. अशाप्रकारे आर्यनने १६,१९६ मतांच्या मोठ्या फरकाने बाजी मारली.

वृत्तांनुसार, उपाध्यक्षपदावर एनएसयूआयचे राहुल झांसला याला २९,३३९ मते मिळाली, तर एबीव्हीपीचा गोविंद तंवरला २०,५४७ मते मिळाली. सचिवपदावर एबीव्हीपीच्या कुणाल चौधरीला २३,७७९ मते मिळाली, तर एनएसयूआयच्या कबीरला १६,११७ मते मिळाली. संयुक्त सचिवपदावर एबीव्हीपीची दीपिका झा विजयी झाली. तिने २१,८२५ मतांनी विजयाचा गुलाल उधळला, तर एनएसयूआयच्या लवकुश भडाना याला १७,३८० मते मिळाली.

या निवडणुकीत एबीव्हीपीने आपली पकड मजबूत केली आहे. विशेषतः अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालयात त्याचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले, तर भगिनी निवेदिता महाविद्यालयात क्लीन स्वीप केला. तसेच, एसजीटीबी खालसा महाविद्यालयात चार जागा, झाकीर हुसैन महाविद्यालयात पाच जागा आणि मिरांडा हाऊस, हिंदू कॉलेज, श्याम लाल कॉलेज, आत्माराम सनातन धर्म कॉलेज येथेही अनेक पदांवर त्यांनी विजय मिळवला.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाची निवडणूक १८ सप्टेंबर पार पडली होती. अटीतटीच्या या लढतीत एबीव्हीपीने आघाडी कायम ठेवली, तर एनएसयूआयला केवळ एका जागेवर विजय मिळवून समाधान मानावे लागले.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) या दोन्ही संघटनांना एकही जागा जिंकता आली नाही. उल्लेखनीय आहे की, २०२४ च्या डूसू निवडणुकीत एनएसयूआयने सात वर्षांच्या कालावधीनंतर अध्यक्ष आणि संयुक्त सचिवपदावर विजय मिळवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT