

HC On Divorce Case : सार्वजनिक ठिकाणी पत्नीने पतीच्या वरिष्ठांसमोर आणि सहकाऱ्यांसमोर अपमान करणे, वारंवार शिवीगाळ करणे, पतीला त्याच्या कुटुंबापासून तोडण्यासाठी पत्नीने सातत्याने आणि दबावपूर्वक केलेले वर्तन निश्चितपणे क्रूरता असून, हे घटस्फोटाचे एक कारण आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल क्षत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच याचिकाकर्त्याचे वर्तन हिंदू विवाह कायद्यानुसार (Hindu Marriage Act) क्रूरता असल्याचे यात कोणतीही शंका नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने पत्नीची कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली.
पत्नीने एकत्रित कुटुंबात राहण्यास नकार दिला होता. तसेच पतीला कौटुंबिक मालमत्तेचे विभाजन करून त्याच्या विधवा आई आणि घटस्फोटित बहिणीपासून वेगळे राहण्याचा दबाव आणला होता. कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(आयए) नुसार पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर केला होता. पत्नीने कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती अनिल क्षत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, "२००९ च्या मे महिन्यात पतीने पत्नीच्या विभक्त राहण्याच्या मागणीला नकार दिल्यानंतर तिने कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसमोर आणि वरिष्ठांसमोर त्याचा सार्वजनिक अपमान केला. तिने पतीवर दुर्लक्ष केल्याचा तसेच स्वतःच्या आनंदाला प्राधान्य न दिल्याचा आरोप केला. अशा प्रकारचे वर्तन, ज्यात वारंवार सार्वजनिक अपमान आणि तोंडी गैरवर्तन समाविष्ट आहे. एका प्रसंगी पत्नीने पतीच्या वरिष्ठांसमोर एका अधिकृत पार्टीमध्ये असभ्य वर्तन केले. यामुळे पतीला खूप लाजिरवाणे वाटले. पत्नीने वारंवार धमक्या देणे आणि पती व त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करणे हीसुद्धा क्रूरताच असून, हे घटस्फोटाचे कारण असू शकते. या प्रकरणातील पत्नीचे वर्तन हे विवाहित जीवनातील सामान्य चढ-उतारांच्या पलीकडचे असून मानसिकक्रूरता इतक्या गंभीर स्वरूपाची आहे की पतीला ते सहन करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. याचिकाकर्त्याचे वर्तन हिंदू विवाह कायद्यानुसार क्रूरता असल्याचे यात कोणतीही शंका नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळली.