Women Reservation Bill 2026 Explained: देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी तीन महत्त्वाची विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली आहेत. महिला आरक्षण आणि परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) ही दोन संवेदनशील आणि भारताच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी विधेयके आहेत.
पहिल्या नजरेत हा विषय गुंतागुंतीचा वाटू शकतो. पण याचा परिणाम थेट तुमच्या मतदानावर, प्रतिनिधित्वावर आणि देशाच्या राजकीय समीकरणांवर होणार आहे. त्यामुळे ही विधेयके नेमकी काय आहेत, का आणली जात आहेत आणि देशात काय बदल होणार आहेत, हे सविस्तर समजून घेणं महत्त्वाचं आहे.
केंद्र सरकारने संसदेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली आहेत:
संविधान (131वा दुरुस्ती) विधेयक, 2026
परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक, 2026
केंद्रशासित प्रदेश कायदा (दुरुस्ती) विधेयक, 2026
या तिन्ही विधेयकांचा एकत्रित उद्देश म्हणजे महिला आरक्षण कायदा प्रत्यक्षात आणणे आणि त्यासाठी आवश्यक असलेली निवडणूक रचना बदलणे.
भारतामध्ये अनेक वर्षांपासून महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर 2023 मध्ये केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) मंजूर केले. या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ऐतिहासिक मानला गेला. पण यात एक अडचण होती, हा कायदा लगेच लागू होऊ शकत नव्हता.
यामागचं कारण म्हणजे परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना)
जुना नियम असा होता की:
आधी नवीन जनगणना होणार
त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन)
आणि मग महिला आरक्षण लागू होणार
यामुळे हा कायदा प्रत्यक्षात 2034 पर्यंत लागू होण्याची शक्यता होती. म्हणजे मंजुरी मिळूनही अंमलबजावणी खूप उशिरा झाली असती.
मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) म्हणजे देशातील निवडणूक मतदारसंघांची नव्याने मांडणी करणे. लोकसंख्या, भौगोलिक रचना आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन मतदारसंघांची संख्या वाढवणे किंवा त्यांच्या सीमा बदलणे याला मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) म्हणतात.
लोकसभा जागांची संख्या:
लोकसभेच्या एकूण जागा (५४३) शेवटच्या वेळी १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १९७६ मध्ये (४२ वी घटनादुरुस्ती) या जागांची संख्या २००१ पर्यंत गोठवण्यात आली होती. पुढे ती २००२ मध्ये पुन्हा २०२६ पर्यंत वाढवण्यात आली.
मतदारसंघांच्या सीमा (सीमांकन): मतदारसंघांच्या सीमांची शेवटची मोठी पुनर्रचना २००२ च्या परिसीमन आयोगाद्वारे करण्यात आली. हे काम २००१ च्या जनगणनेवर आधारित होते.
या पुनर्रचनेत लोकसभेच्या एकूण जागा वाढल्या नाहीत.
फक्त राज्यांतर्गत मतदारसंघांच्या सीमा बदलल्या.
सरकारने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे:
2027 च्या जनगणनेची वाट न पाहता
2011 च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करणार
यामुळे महिला आरक्षण लवकर लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा कायदा 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या लोकसभेत 543 जागा आहेत.
नवीन प्रस्तावानुसार:
लोकसभा जागांची संख्या वाढवून 850 पर्यंत नेली जाऊ शकते
प्रत्येक राज्यात साधारण 50 टक्क्यांनी जागा वाढवल्या जातील
कोणत्याही राज्याच्या जागा कमी केल्या जाणार नाहीत
हा मुद्दा राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.
विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांनी काही चिंता व्यक्त केल्या आहेत.
त्यांचा मुद्दा असा आहे:
त्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगलं केलं
पण जर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढल्या
तर उत्तरेकडील राज्यांना अधिक राजकीय ताकद मिळू शकते
यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा समतोल बिघडू शकतो, अशी त्यांची भीती आहे. सरकारने मात्र स्पष्ट केलं की, कोणत्याही राज्याच्या जागा कमी होणार नाहीत आणि सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढवल्या जातील.
या प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र परिसीमन आयोग स्थापन केला जाईल.
हा आयोग:
सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करेल
स्थानिक परिस्थिती लक्षात घेईल
आणि अंतिम मतदारसंघांची रचना ठरवेल
म्हणजे हा एक तांत्रिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर चालणारा मोठा उपक्रम असेल.
या विधेयकांवर संसदेत सविस्तर चर्चा होणार आहे:
लोकसभेत 18 तास चर्चा
त्यानंतर मतदान
मग राज्यसभेत 10 तास चर्चा आणि मतदान
जर दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी मिळाली, तर हा कायदा प्रत्यक्षात लागू होईल.
हे बदल केवळ महिला आरक्षणापुरते मर्यादित नाहीत. तर यामुळे:
देशाचा राजकीय नकाशा बदलू शकतो
काही राज्यांची ताकद वाढू शकते
काही ठिकाणी नवीन नेतृत्व उदयाला येऊ शकतं
महिलांचं प्रतिनिधित्व वाढेल
हे विधेयक म्हणजे भारताच्या लोकशाहीसाठी मोठं वळण आहे. महिला सक्षमीकरण, निवडणूक रचना आणि संघराज्यीय संतुलन या तिन्ही गोष्टींवर याचा प्रभाव पडणार आहे. जर हे विधेयक मंजूर झाले, तर 2029 च्या निवडणुका आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या आणि ऐतिहासिक ठरू शकतात.