Chhattisgarh Suitcase Murder Wife Kills Husband: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. एका महिलेने आपल्या पतीचा खून करून त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवला आणि नंतर स्वतःच्या मुलीला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव मंगरिता भगत आहे. ती काही दिवसांपूर्वी मुंबईहून आपल्या मूळ गावी परतली होती. तिचा पती संतोष भगत (43) याच्यासोबत तिचं नेहमीच भांडण व्हायचं. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि संतापाच्या भरात मंगरिताने लोखंडी हातोड्याने पतीवर वार केले. यात संतोषचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर मंगरिताने संतोषचा मृतदेह चादरीत गुंडाळला, एका लाल रंगाच्या ट्रॉली सूटकेसमध्ये ठेवला आणि घरातच लपवून ठेवला. काही वेळानं स्वतःच्या मुलीला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.
ही धक्कादायक माहिती ऐकून मुलगी आणि तिचा नवरा तत्काळ कोरबाहून गावात पोहोचले. त्यांनी आईच्या भावाला विनोद मिन्ज याला सर्व घटना सांगितली, त्याने तत्काळ पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरातील सूटकेस उघडली, त्यात संतोषचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला सापडला. त्याच्या चेहऱ्यावर आणि हातांवर स्पष्ट जखमा व रक्ताचे डाग होते, ज्यावरून त्याच्यावर क्रूरपणे हल्ला झाल्याचं दिसून आलं.
कुटुंबीयांच्या मते, मंगरिता मुंबईत काम करत होती आणि काही दिवसांपूर्वीच ती गावात आली होती. मात्र खून केल्यानंतर ती पुन्हा मुंबईला गेली.
जशपूरचे पोलीस अधीक्षक शशी मोहन सिंग यांनी सांगितले की, संतोष भगतच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झालं की, पत्नीनं पतीचा खून करून मुलीला स्वतःच माहिती दिली. आरोपी मुंबईला पळून गेल्याची शक्यता आहे, आणि तिच्या शोधासाठी विशेष पथक पाठवण्यात आलं आहे,” असं सिंग यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, खुनामागचं नेमकं कारण आरोपीच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. पोलिसांचा तपास सुरू आहे.