

केज: पोलीस ठाण्याच्या अगदी समोर, रस्त्यावर उभ्या असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांच्यावर धक्कादायक हल्ला करण्यात आला आहे. 'तुमच्याशी बोलायचे आहे' असे सांगून बाजूला नेत हल्लेखोरांनी जाधव यांच्या डाव्या हाताच्या बोटाला कडकडून चावा घेतला आणि बोटाचा एक भाग तोडला.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाही मारहाण करण्यात आली. संपूर्ण कुटुंबाला 'रिंगण करून मारण्याची' आणि खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने केज परिसरात गुंडगिरी पुन्हा उफाळून येण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची सुरुवात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाली. गावातील प्रमोद बिभीषण पवार आणि सुजित बिभीषण पवार यांनी खरमाटा येथील सुभाष जाधव यांच्या वृद्ध आई प्रयागाबाई जाधव यांच्या घरासमोर जाऊन त्यांना धमकावले. 'तुमच्या मुलाला आम्ही आता जिवंत सोडणार नाही, त्याला रिंगण करून मारणार,' अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकारानंतर सुभाष जाधव यांनी आई आणि पुतण्या सौरभ जाधव यांना केज पोलीस ठाण्यात बोलावले, आणि ते स्वतः देखील पोलीस ठाण्यासमोर आले होते.
बुधवारी (दि.१२) दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास सुभाष जाधव पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर उभे असताना प्रमोद बिभीषण पवार आणि सुजित बिभीषण पवार त्यांच्याजवळ आले. प्रमोद पवार यांनी 'बोलायचे आहे, थोडे बाजूला या' असे सांगून त्यांना बाजूला नेले आणि तत्काळ त्यांच्या डाव्या हाताची तर्जनी तोंडात धरून कडकडून चावा घेतला, ज्यामुळे बोटाचा एक 'कांडा' (भाग) तुटला. या झटापटीत सुभाष जाधव यांचे पुतणे सौरभ विक्रम जाधव आणि मुलगा सुरज सुभाष जाधव भांडण सोडविण्यासाठी आले असता, दोन्ही हल्लेखोरांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
हल्ला करताना हल्लेखोरांनी जाधव कुटुंबाला शिवीगाळ करत 'आम्ही रिल स्टार आहोत, तुमचे घर संपवून टाकू. तुमच्यावर खोट्या विनयभंगाच्या केसेस करून जेलमध्ये टाकू,' अशा धमक्या दिल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात प्रमोद बिभीषण पवार आणि सुजित बिभीषण पवार (दोघे रा. खरमाटा, ता. केज) यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३२६, ३२४, ५०४, ५०६ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार हनुमंत मुंडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.