why indian trains are delayed top reasons railway report not weather
पुढारी ऑनलाईन : हिवाळा सुरू झाला किंवा मुसळधार पाऊस झाला की ट्रेन उशिरा धावण्याचे सत्र सुरू होते. अलीकडे मुसळधार पावसामुळे गुजरात आणि मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक ट्रेन तब्बल १७ तासांपर्यंत उशिरा धावल्या. त्याचप्रमाणे हिवाळ्यात धुक्यामुळेही अनेक ट्रेन उशिरा धावतात.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की धुके आणि पाऊस हेच ट्रेन उशिरा होण्याचे एकमेव कारण नाही? ट्रेन उशिरा होण्यामागे ३३ पेक्षा जास्त कारणे आहेत. यातील बहुतांश कारणे रेल्वेच्या नियंत्रणात असतात. यापैकी काही कारणांमुळे तर निम्म्यापेक्षा जास्त वेळा ट्रेन उशिरा धावतात आणि विशेष म्हणजे त्यात हवामानाचा थेट संबंध नसतो.
मग ट्रेन सर्वाधिक कोणत्या कारणांमुळे उशिरा धावतात, जाणून घेऊया...
काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या प्रशिक्षण संस्थेने IRITM ने CAG च्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे ट्रेन उशिरा होण्यासंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टनुसार, साधारणपणे ट्रेन उशिरा होण्यामागे ३३ कारणे असतात. यामध्ये खराब हवामानाचाही समावेश आहे.
मात्र, या ३३ कारणांपैकी २७ कारणे रेल्वेच्या नियंत्रणातील आहेत. या २७ कारणांपैकी केवळ ६ कारणांमुळे ६५ ते ६६ टक्के ट्रेन उशिरा धावतात. त्यामुळे ट्रेन उशिरा होण्यामागे ही सहा कारणे सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे म्हणता येते.
ट्रेन उशिरा होण्याची ६ प्रमुख कारणे
आउट ऑफ पाथ (Out of Path)
एखादी ट्रेन नियोजित वेळेत किंवा ठरलेल्या मार्गावर चालवता आली नाही आणि इतर ट्रेनला मार्ग देण्यासाठी तिला थांबवावे लागले किंवा दुसऱ्या ट्रॅकवर वळवावे लागले, तर ट्रेनला उशीर होतो.
इंजिनीअरिंग (Engineering)
रेल्वे ट्रॅक, पूल, सिग्नल किंवा इतर रेल्वे पायाभूत सुविधांची दुरुस्ती व देखभाल सुरू असल्यास ट्रेनचा वेग कमी करावा लागतो किंवा काही काळ ट्रेन थांबवावी लागते. त्यामुळे ट्रेन उशिरा धावू शकते.
ट्रॅफिक (Traffic)
एखाद्या मार्गावर ट्रेनची संख्या जास्त असल्यास किंवा रेल्वेच्या परिचालनावर मोठा ताण असल्यास ट्रेनला सिग्नलवर थांबावे लागू शकते. त्यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
प्लॅन्ड ब्लॉक (Planned Block)
रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती किंवा देखभाल करण्यासाठी आधीच ठरावीक वेळेत रेल्वे मार्ग बंद केला जातो. या कालावधीत त्या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनला उशीर होऊ शकतो.
झोन डिफरन्स (Zone Difference)
एखादी ट्रेन एका रेल्वे झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जात असेल आणि पहिल्या झोनमध्येच ती उशिरा पोहोचली, तर पुढील झोनलाही ती ट्रेन त्याच विलंबासह चालवावी लागते.
रिसेड्युल (Reschedule)
परिचालनातील अडचणी, ट्रॅफिक, देखभाल किंवा इतर परिस्थितींमुळे रेल्वे ट्रेनच्या निर्धारित प्रस्थानाच्या वेळेत बदल करू शकते. त्यामुळे ट्रेनचा संपूर्ण प्रवास नियोजित वेळेपेक्षा पुढे ढकलला जातो.
याशिवाय कोणत्या कारणांमुळे ट्रेनला उशिर होतो?
वरील कारणांव्यतिरिक्त खराब हवामान, चेन पुलिंग, समाजकंटकांच्या कारवाया, आंदोलन, अपघात, डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिनमध्ये बिघाड, कोच आणि मालवाहू डब्यांमध्ये (वॅगन) बिघाड, ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनमध्ये अडचण, वीज ग्रीड फेल होणे, सिग्नलमध्ये बिघाड, रनओव्हर, लेव्हल क्रॉसिंगवरील अडचणी अशा विविध कारणांमुळेही ट्रेन अनेकदा उशिरा धावतात.
म्हणजेच, ट्रेन उशिरा होण्यामागे केवळ धुके किंवा पाऊसच जबाबदार नसतो. रेल्वेच्या परिचालनाशी संबंधित अनेक कारणांचाही ट्रेनच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो.