NEET Paper Leak: देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG पुन्हा एकदा पेपर लीक वादात सापडली आहे. 2024 नंतर आता 2026 मध्येही परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेल्या या परीक्षेत तब्बल 24 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. NEET चा पेपर पुन्हा पुन्हा कसा लीक होतो, पण JEE Main सारख्या मोठ्या परीक्षांमध्ये असे प्रकार फार कमी का दिसतात? शिक्षण तज्ज्ञांच्या मते, यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे दोन्ही परीक्षांच्या पद्धतीत आणि व्यवस्थापनात असलेला मूलभूत फरक.
NEET UG अजूनही पारंपरिक पेन-पेपर मोडमध्ये घेतली जाते. म्हणजे विद्यार्थ्यांना OMR शीटवर उत्तरं भरावी लागतात. यासाठी लाखो प्रश्नपत्रिका छापाव्या लागतात, त्या देशभरातील विविध शहरांमध्ये पोहोचवाव्या लागतात आणि सुरक्षित ठेवाव्या लागतात.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रश्नपत्रिका अनेक प्रोसेस मधून जातात. प्रिंटिंग प्रेस, बँक लॉकर, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षा केंद्र. त्यामुळे पेपर लीक होण्याचा धोका वाढतो, कारण अनेक लोकांचा प्रश्नपत्रिकेशी संपर्क येतो.
याउलट JEE Main ही पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आहे. प्रश्नपत्रिका एन्क्रिप्टेड डिजिटल सर्व्हरवर सुरक्षित ठेवली जाते आणि परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ती उघडली जाते. त्यामुळे परीक्षा आधी पेपर चोरी किंवा लीक होणं शक्य नाही.
NEET परीक्षा देशभरात एकाच दिवशी आणि एकाच प्रश्नपत्रिकेसह घेतली जाते. त्यामुळे एका ठिकाणी पेपर लीक झाला, तर त्याचा परिणाम संपूर्ण देशातील परीक्षेवर होतो.
दुसरीकडे, JEE Main अनेक दिवस आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रत्येक शिफ्टमध्ये वेगळे प्रश्न असतात. त्यामुळे एखाद्या केंद्रावर काही गडबड झाली, तरी संपूर्ण परीक्षेवर त्याचा परिणाम होत नाही.
NEET साठी देशभरात जवळपास 4,700 ते 5,000 परीक्षा केंद्रं तयार केली जातात. यामध्ये अनेक शाळा आणि कॉलेजांचा समावेश असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी समान सुरक्षा व्यवस्था असणं शक्य होत नाही.
तर JEE Main फक्त मर्यादित आणि विशेष डिजिटल परीक्षा केंद्रांवर घेतली जाते. या केंद्रांमध्ये उच्च दर्जाचे CCTV, बायोमेट्रिक पडताळणी आणि नेटवर्क मॉनिटरिंग यांसारख्या सुविधा असतात. त्यामुळे फसवणुकीची शक्यता तुलनेने कमी असते.
NEET UG 2026 चा वाद अधिक गंभीर तेव्हा झाला, जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ‘गेस पेपर’ मधील 100 हून अधिक प्रश्न मूळ परीक्षेशी जुळल्याचा दावा करण्यात आला.
यानंतर परीक्षेच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर NTA ने परीक्षा रद्द केली आणि संपूर्ण प्रकरण CBI कडे सोपवलं. आता 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
सततच्या वादांनंतर आता NEET परीक्षाही JEE Main प्रमाणे ऑनलाइन किंवा हायब्रिड मोडमध्ये घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ऑनलाइन परीक्षा झाल्यास पेपर लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, यामध्ये मोठ्या अडचणीही आहेत.
ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा, संगणकांची उपलब्धता आणि डिजिटल पायाभूत सुविधांची कमतरता ही मोठी आव्हानं मानली जात आहेत. त्यात दरवर्षी 20 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET परीक्षा देतात. इतक्या मोठ्या स्तरावर ऑनलाइन परीक्षा आयोजित करणं सोपं नाही.
सोप्या भाषेत सांगायचं तर, JEE Main मध्ये डिजिटल सुरक्षा असल्यामुळे पेपर लीक होणं कठीण आहे, तर NEET अजूनही जुन्या ऑफलाइन पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्यात लिक होण्याचा धोका अधिक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.