प्रतिकात्‍मक छायाचित्र. (AI-generated image) Pudhari
राष्ट्रीय

Bhutan rejects E20 petrol : भूतानने का नाकारली भारताची E20 पेट्रोलची ऑफर? समोर आले मोठे कारण

भारतीय तेल कंपन्यांकडून एथेनॉल-मिश्रित इंधन घेण्यास भूतानचा नकार

पुढारी वृत्तसेवा

Bhutan rejects E20 petrol : भारतात E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, भूतानने भारतीय तेल कंपन्यांकडून एथेनॉल-मिश्रित (Ethanol-blended) इंधन घेण्यास नकार दिला आहे. भूतानचे म्हणणे आहे कि, त्यांचे जुने अंडरग्राउंड इंधन टँक (भूमिगत टाक्या), डोंगराळ भाग आणि अति-दमट हवामान E20 पेट्रोलसाठी अजिबात योग्य नाही.

E20 इंधन पुरवठ्याचा प्रस्ताव फेटाळून

भारतात E20 पेट्रोलवरून सुरू असलेली चर्चा आणि विरोधाच्या दरम्यान, भूतानने भारताच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचा (OMCs) E20 इंधन पुरवठ्याचा प्रस्ताव शांतपणे फेटाळून लावला आहे. भूतानचे प्रमुख वृत्तपत्र 'द भूटानीज'च्या वृत्तानुसार, भूतानने भारताला सांगितले आहे की, जोपर्यंत भारतीय बाजारपेठेत सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे, तोपर्यंत तोच पुरवठा सुरू ठेवावा. अखेर भूतानने एथेनॉल-मिश्रित पेट्रोलबाबत एवढा तीव्र आक्षेप का घेतला? याबाबत जाणून घेवूया

पायाभूत सुविधांचा अभावासह कठीण भौगोलिक परिस्थिती

वास्तविक पाहता, याचे सर्वात मोठे कारण भूतानमधील इंधन साठवणुकीच्या जुन्या आणि कमकुवत पायाभूत सुविधा हे आहे. देशातील बहुतांश इंधन टाक्या जमिनीच्या खाली (अंडरग्राउंड) बांधलेल्या आहेत. त्यामध्ये पाणी गळतीची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत E20 पेट्रोल खराब होण्याचा आणि वाहनांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. याशिवाय, भूतानचा डोंगराळ आणि दुर्गम भाग हे देखील एक मोठे आव्हान आहे, वाहनांना सतत अधिक पॉवर आणि विश्वासार्ह कामगिरीची गरज असते. या कठीण परिस्थितीत E20 पेट्रोल अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकणार नाही, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे.

भूतान आपले सर्व इंधन भारतातूनच आयात करतो

भारतात E20 पेट्रोल म्हणजेच २० टक्के एथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोलच्या मिश्रणावरून आधीच वाद सुरू आहे. विशेषतः २०२३ पूर्वी तयार केलेल्या पेट्रोल गाड्यांचे मालक मायलेज कमी होणे, देखभालीचा खर्च वाढणे आणि इंजिनवर अतिरिक्त ताण येण्याची तक्रार करत आहेत. मात्र, सरकारचे म्हणणे आहे की, E20 मुळे मायलेजमध्ये किरकोळ घट होते, परंतु त्या बदल्यात इंजिनची कामगिरी (Performance) आणि एक्सीलरेशन सुधारते. आपल्या देशाच्या E20 पॉलिसीचा थेट परिणाम भूतानवर होतो कारण भूतान आपले सर्व इंधन भारतातूनच आयात करतो.

भारताकडून भूतान घेतो 'एक्सपोर्ट ग्रेड' पेट्रोल-डिझेल

भूतान सध्या भारताकडून उच्च गुणवत्तेचे एक्सपोर्ट ग्रेड पेट्रोल आणि डिझेल खरेदी करतो. याची किंमत भारतीय पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या इंधनापेक्षा जास्त असते; परंतु आता भूतानच्या व्यापार विभागाने IOCL, BPCL आणि HPCL सारख्या भारतीय कंपन्यांची E20 पुरवठ्याची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे.

काय आहे वैज्ञानिक कारण?

जुन्या अंडरग्राउंड टाक्यांमध्ये पाणी गळती होणे ही सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत E20 पेट्रोल सुरक्षित ठेवणे कठीण होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, एथेनॉलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असतो, ज्यामुळे ते अत्यंत हायग्रोस्कोपिक (Hygroscopic) असते, म्हणजेच ते वातावरणातील ओलावा किंवा नमी सहज शोषून घेते.सामान्य पेट्रोलच्या तुलनेत E20 मध्ये पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. जर अशा इंधनात पाणी विरघळले, तर ते सहज वेगळे करता येत नाही. यामुळे इंधनाचा दर्जा खराब होतो आणि स्टीलच्या टाक्या तसेच पाईपलाईन गंजण्याची प्रक्रिया वेगवान होते. दीर्घकाळात याचा परिणाम वाहनांच्या इंजिनवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. भूतान सरकारने म्हटले आहे की, देशातील अनेक भूमिगत साठवण टाक्यांची सध्याची स्थिती पाहता, एथेनॉल-मिश्रित इंधनाची आयात आणि साठवणूक करताना त्याचा दर्जा टिकवून ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते.

भूतानमध्ये E20 इंधन साठवण्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर नाही

भूतानचे बहुतांश इंधन डेपो डोंगराळ आणि अति-दमट भागात आहेत, जेथे टाक्यांमधील ओलावा किंवा कंडेन्सेशन (Condensation) रोखणे अत्यंत कठीण आहे. याच कारणामुळे भूतानने भारतीय तेल कंपन्यांना अशीही विनंती केली आहे की, भविष्यात भारताने पेट्रोलमध्ये एथेनॉल-ब्लेंडिंगचे प्रमाण वाढवल्यास किंवा पूर्णपणे एथेनॉल-आधारित इंधन स्वीकारल्यास, त्याची पूर्वकल्पना द्यावी. तसेच, लीक-प्रूफ इंधन टाक्या उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

भौगोलिकदृष्‍ट्या भूतानला हवे आहे एथेनॉल विरहित पेट्रोल

नुकतेच भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान सांगितले होते की, E20 पॉलिसी हा एक 'प्रयोग' आहे आणि त्याचे खरे परिणाम पुढील वर्षापर्यंत समोर येतील. या विधानावरून वाद वाढल्यानंतर सरकारने असे कोणतेही विधान केल्याचा इन्कार केला, परंतु अटॉर्नी जनरल यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यादरम्यान, भारताने E25 पेट्रोल म्हणजेच २५ टक्के एथेनॉल-ब्लेंडिंग असलेल्या इंधनाची चाचणी देखील सुरू केली आहे. अहवालानुसार, जर चुकून E20 इंधन भूतानला पाठवले गेले, तर ते सहज ओळखता येईल, कारण थोडासा ओलावा मिळताच या इंधनाचा रंग दुधासारखा पांढरा होईल. भूतानचे हे उदाहरण दर्शवते की, इंधनात बदलाचे धोरण प्रत्येक देशासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी सारखे असू शकत नाही. विशेषतः डोंगराळ आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागात शुद्ध पेट्रोल (०% एथेनॉल ब्लेंडिंग) हाच अजूनही अधिक व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT