Who is Lawyer Rakesh Kishore Supreme Court
नवी दिल्ली : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज (दि.६) सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट क्र १. मध्ये सुनावणी दरम्यान घडली. यावेळी वकिलाने "सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान" अशा घोषणाही दिल्या. जाणून घेवूया हा प्रकार घडण्यामागे काेणती याचिका फेटाळण्याशी जाेडला जात आहे याविषयी...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर (CJI Gavai) वकील राकेश किशोर यांनी बूट फेकल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११.३५ वाजता कोर्ट क्र. १ मध्ये सुनावणीदरम्यान घडली. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश किशोर नावाच्या वकिलाने आपले स्पोर्टस् शूज (खेळाचे बूट) काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा युनिटकडे सोपवण्यात आले. तो मयूर विहार भागातील रहिवासी असून सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचा नोंदणीकृत सदस्य आहे," अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे पत्रक डाऊनलोड करा
राकेश दलाल यांनी छतरपूर जिल्ह्यातील जावरी मंदिरात असलेल्या भगवान विष्णूच्या सात फूट उंच, क्षतिग्रस्त मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवून तिची प्राणप्रतिष्ठा करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. जवारी मंदिर हे मध्य प्रदेशातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या खजुराहो मंदिर समूहाचा भाग आहे. १६ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीश म्हणाले हाेते की, हा मुद्दा पूर्णपणे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ASI) अधिकारक्षेत्रात येतो. हा एक पुरातत्वीय शोध आहे. 'एएसआय' असे काही करण्यास परवानगी देईल की नाही... यात विविध मुद्दे आहेत. ही निव्वळ प्रचार हित याचिका आहे. तुम्ही जर भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचे सांगत असाल, तर प्रार्थना करा आणि थोडे ध्यान करा. जर तुम्हाला शैव धर्माबद्दल आक्षेप नसेल, तर तुम्ही तेथे जाऊन पूजा करू शकता.तिथे खजुराहोतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मोठे शिवलिंग आहे."
सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळताना केलेल्या टिप्पणीवर सोशल मीडियावर अनेक टीकात्मक पोस्ट आल्या. यावर प्रतिक्रिया देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "मी सरन्यायाधीश गवई यांना गेल्या १० वर्षांपासून ओळखतो. न्यूटनचा नियम होता की, प्रत्येक क्रियेची समान प्रतिक्रिया असते. आता मात्र प्रत्येक क्रियेवर सोशल मीडियावर अतिरंजित प्रतिक्रिया येते. सरन्यायाधीशांनी सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत. या प्रकरणी सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रियांवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "आम्ही दररोज याचा त्रास सहन करतो आहोत. हा एक बेलगाम घोडा आहे. त्याला आवर घालण्याचा कोणताही मार्ग नाही."
खजुराहो येथील जावरी मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती बसवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात केलेल्या टिपण्णीवर सोशल मीडियावर उमटलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांची सरन्यायाधीश गवई यांनी दखल घेतली होती. ते म्हणाले होते की, "कोणीतरी मला सांगितले की मी याचिका फेटाळताना केलेल्या केलेल्या टिप्पण्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मी सर्व धर्मांचा आदर करतो."