Nishant Kumar Pudhari
राष्ट्रीय

Who is Nishant Kumar: अभियांत्रिकीचे शिक्षण..अध्यात्म ते राजकारण...नितीश कुमारांचे चिरंजीव निशांत यांचा प्रवास वाचा

Nishant Kumar Son: वयाच्या पन्नाशीत निशांत कुमार यांना राजकारणात का यावं लागतंय.

पुढारी डिजिटल टीम

NItish Kumar Son Nishant Kumar Information in Marathi

पाटणा : आजवरच्या राजकीय कारकिर्दीत घराणेशाहीवरुन विरोधकांवर तोंडसूख घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे चिरंजीव आता राजकारणात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले. मृदुभाषी, आध्यात्मिक आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणारे निशांत कुमार हे नितीश कुमारांचे उत्तराधिकारी असतील, अशी शक्यता आहे. वयाच्या पन्नाशीत निशांत कुमार यांना राजकारणात का यावं लागतंय, निशांत कुमार यांचे शिक्षण किती हे जाणून घ्या 'पुढारी' विश्लेषणातून...

1. निशांत कुमार यांची जन्मतारीख काय?

निशांत कुमार यांचा जन्म 20 जुलै 1975 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव मंजू सिन्हा होते. मंजू सिन्हा या आधी शाळेत शिक्षिका होत्या. नितीश कुमार राजकारणात व्यग्र असल्याने निशांतची संपूर्ण जबाबदारी आई मंजू यांच्याकडेच होती. 2007 मध्ये प्रदीर्घ आजारामुळे मंजू यांचे निधन झाले. निशांत यांच्यासाठी हा मानसिक धक्काच होता.

2. निशांत कुमार यांचे बालपण कसे होते?

निशांत कुमार यांना सुरूवातीला पाटण्यातील सेंट केरेन्स या शाळेत होते. मात्र, तेथील शिक्षकाने निशांत यांना मारले. शिक्षकाच्या मारहाणीमुळे निशांत घाबरले. त्यांना तापही भरला. यानंतर नितीश कुमार यांनी निशांतना मसूरीतील बोर्डिंग शाळेत पाठवले. पण तिथे गेल्यावर निशांत यांना आई आणि घराची आठवण यायची. आई मंजूदेवींनी निशांतना पुन्हा बिहारमध्ये बोलावलं आणि शेवटी पाटण्यातील केंद्रीय विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

3. निशांत कुमार यांचे शिक्षण किती?

महाविद्यालयीन शिक्षणासाठी निशांत कुमार यांनी रांचीजवळील मेसरातील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे प्रवेश घेतला. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. सुरूवातीच्या दोन वर्षात महाविद्यालयातील वर्गमित्रांना निशांत कोण आहेत याची कल्पनाही नव्हती. नम्रपणा, शांत स्वभाव आणि अत्यंत साधी राहणी यासाठी ते ओळखले जायचे. बिहारच्या काही राजकीय नेत्यांची मुलं हे त्यांचे वर्गमित्र होते.

4. अध्यात्माच्या मार्गावर निघालोय

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, 2024- 25 च्या सुमारास निशांत कुमार हे पाटण्यातील बाजारपेठेत फिरताना दिसले. त्यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता निशांत म्हणाले, मी 'हरे रामा हरे कृष्णा' ऐकतो आणि त्यासाठीच मी स्पीकर खरेदीसाठी बाजारात आलो. राजकारणात येणार का या प्रश्नावर त्यांनी 'सध्या अध्यात्माच्या वाटेवर चालतोय', असं उत्तर दिले होते. आईच्या निधनानंतर कदाचित निशांत कुमार हे एकटे पडले असावे आणि यातून ते आध्यात्मिक झाले असावे, असा अंदाज वर्तवला जातो.

भगवद्गीतापासून बऱ्याच आध्यात्मिक पुस्तकांचं त्यांनी वाचन केले आहे. नितीश कुमार आणि निशांत कुमार यांच्यात आणखी एक साम्य म्हणजे दोघांवरही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ ओशोचा प्रभाव होता.

5. घराणेशाहीला विरोध करणारे नितीश कुमार मुलाच्या राजकीय एंट्रीसाठी राजी कसे झाले?

नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यांवरुन बिहारमध्ये रणशिंग फुंकले होते. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर त्यांनी तोंडसुख घेतले. मुलाला राजकारणात आणायचं नाही, यावर नितीश कुमार ठाम होते. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे.

नितीश कुमार यांच्या कुटुंबातील मंडळी आणि पक्षातील निकटवर्तीय यांनी पक्षाच्या भविष्यासाठी निशांत कुमार यांनी राजकारणात येणं गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला. पक्षाची धूरा सांभाळण्यासाठी पर्यायी नेतृत्व नसेल तर अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्याकडेच पक्षाची जबाबदारी द्यावी, असं नितीश कुमारांना सांगण्यात आले.

6. नितीश कुमार यांच्या कुटुंबातून कोणी पुढाकार घेतला?

नितीश कुमार यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये नितीश यांचे बंधू सतीश कुमार आणि निशांत यांचे मामा प्रकाश सिंह यांचा समावेश होतो. मंजू देवींच्या निधनानंतर प्रकाश सिंह आणि त्यांची पत्नी हे नितीश कुमारांसोबत मुख्यमंत्री निवासात राहत होते. तर सतीश कुमार हे मातोश्रीच्या निधनानंतर नितीश कुमारांसोबत राहू लागले. या सर्वांनी नितीश कुमारांची चर्चा करत त्यांना राजी केल्याचे इंग्रजी माध्यमांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT