ऐन दिवाळीत बिहार विधानसभेची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.
खरा सत्तासंघर्ष सत्ताधारी भाजप-जनता दल संयुक्त आणि महाआघाडीमध्ये आहे.
लोकगायिका मैथिली ठाकूर भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
Maithili Thakur Bihar Assembly election 2025
पाटणा : ऐन दिवाळीत बिहार विधानसभेची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. दोन टप्प्यांत होणार्या या निवडणुकीत खरा सत्तासंघर्ष सत्ताधारी भाजप-जनता दल संयुक्त आणि महाआघाडी यांच्यामध्ये होणार आहे. सोशल मीडियातून प्रसिद्ध झोतात आलेल्या लोकगायिका मैथिली ठाकूर भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. आता बिहारमधील सत्तासंघर्षात मैथिली यांचा निभाव लागणार का? हाच विधानसभेच्या प्राथमिक टप्प्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. अलीनगर मतदारसंघ हा बहुचर्चित ठरला आहे. जाणून घेवूया मैथिली ठाकूर कोण आहेत, त्यांच्यासमोर असणार्या राजकीय आव्हानांविषयी....
पाच वर्षांपूर्वी देशभरात कोरानाच्या महामारीचे संकट आलं. सर्व देशवासीय अघोषित बंदिवासात गेले. याच काळात बिहारमध्ये सोशल मीडियावर बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी असणार्या तरुणीचा चेहरा भलताच प्रसिद्धच्या झोतात आला. तिचे नाव होते मैथिली ठाकूर. त्यावेळी २० वर्षांच्या असणार्या मैथिलीने आपल्या दोन भावांसह युट्यूबवर गाण्यांचे व्हिडिओ अपलोड केले.अल्पावधीत तिला मोठी प्रसिद्ध मिळाली. आज मैथिली यांचे युट्यूबवर पाच दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तिचे इंस्टाग्रामवर ६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मैथिली मूळची बिहारमधील असले तरी लहानपणापासून दिल्लीत राहिली. वडील रमेश ठाकूर देखील एक संगीतकार आहेत. कौटुंबिक परिस्थिती आणि गायन सरावामुळे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. १२व्या वर्षी एमसीडी शाळेत प्रवेश घेतला. बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिष्यवृत्ती मिळाली. यांनतर दिल्ली विद्यापीठात बीए पदवी मिळवली प्राप्त केली आहे.
मैथिलीचे वडील रमेश ठाकूर यांनी प्रथम युट्यूबवर मैथिली आणि तिच्या दोन भावांचे गाणे गातानाचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. मैथिलीसोबत तिचा मोठा भाऊ तबल्यावर आणि तिचा धाकटा भाऊ इतर वाद्यांवर वाजवत होता. सोशल मीडियावर लोकप्रिय नाव झाल्यानंतर मैथिली यांनी लोकगीते, शास्त्रीय गायन आणि भजनांचे अनेक अल्बम रिलीज केले. मैथिली यूट्यूब अकाउंटवर लोकगीतांचे, शास्त्रीय गायनाचे आणि भजनांचे व्हिडिओ देखील अपलोड करतात. लोकगीतांमध्ये प्रामुख्याने भोजपुरी आणि मैथिली गाणी समाविष्ट आहेत.
मैथिली ठाकूर यांच्या राजकीय प्रवास हा विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुरु झाला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. मात्र दुसर्या यादीत अलीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने तिकीट दिले. या मतदारसंघामध्ये एखाद्या कलाकाराने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मैथिली ठाकूर या बिहारमधील प्रसिद्ध प्रसिद्ध लोकगायिका आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या घरोघरी पोहचल्या आहेत. विशेषतः महिला त्यांच्या गाण्यांच्या चाहत्या आहेत. या सर्व कारणांमुळे अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखरू करताना अपेक्षेनुसार प्रचंड गर्दी झाली.
मैथिली ठाकूर या मुळच्या बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार असा नारा विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिला. मैथिलीच्या तिकीटानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या विरोधामुळे भाजप सतर्क झाला आहे. भाजपचे नेते संतप्त होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असंतुष्ट नेत्यांना पाटण्याला बोलावून त्यांची भेट घेतली. आता स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार असा प्रचार जरी होत असला तरी त्याचा मतांवर किती परिणाम होणार हे निकालादिवशी स्पष्ट होणार आहे.
मैथिलीविरोधात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे विनोद मिश्रा निवडणूक लढवत आहेत. ते स्थानिक उमेदवार आहेत. मैथिली यांच्यासमोर आव्हान म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत विनोद मिश्रा हे केवळ ३१०० मतांनी पराभूत झाले होते. दरभंगामधील अलीनगर हा एक छोटासा विधानसभा मतदारसंघ आहे, परंतु यावेळी तो खूप चर्चेत आहे तो याच कारणामुळे.
मागील म्हणजे २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघात भाजप युतीतील मुकेश साहनी यांच्या नेतृत्वाखालील विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी)ने बाजी मारली होती. जागावाटपात ही जागा व्हीआयपींना गेल्यानंतर, मुकेश साहनी यांच्याकडून मजबूत उमेदवार नसल्याचा हवाला देत भाजपने मिश्रीलाल यांना तिकीट दिले.व्हीआयपी कोट्यातील एनडीए उमेदवार मिश्रीलाल यादव यांना ६१,०८२ मते मिळाली. आरजेडीचे विनोद मिश्रा ५७,९८१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आले. अत्यंत चुरशीच्या लढतीत, एनडीए उमेदवार ३,१०१ मतांच्या जवळपास फरकाने विजयी झाले. परंतु नंतर मिश्रीलाल यादव भाजपमध्ये सामील झाले. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी त्यांना जुन्या मारहाण प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जूनमध्ये बिहार विधानसभा सचिवालयाने यादव यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली. आता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अलीनगर विधानसभा मतदारसंघात १२.३७ टक्के अनुसूचित जातीचे मतदार आहेत. ५८,४१९ मुस्लिम मतदार आहेत. २०२० च्या निवडणुकीत या मतदारसंघात २,५०,००० पेक्षा जास्त मतदार होते.
२०२० च्या निवडणुकीत, अलीनगरमध्ये राष्ट्रीय जनता दलाने जातीचे राजकारणाला प्राधान्य देत विनोद मिश्रा यांना उमेदवारी दिली. आरजेडी भाजपच्या मुख्य ब्राह्मण मतांना धक्का देण्यात यशस्वी झाल्याचे दिसले. २०२० च्या निवडणुकीत भाजपला विश्वास होता की ब्राह्मण मतदार आरजेडीला पाठिंबा देणार नाहीत. पण हा अंदाज पूर्णपणे चुकला. अलीनगर विधानसभा मतदारसंघात यादव आणि ब्राह्मण मतदारांची संख्या जवळपास समान आहे. आता आता २०२०मधील निवडणुकीतून धडा घेत भाजपने ब्राह्मण असणार्या मैथिली ठाकूर ही ब्राह्मण आहे आणि जातीच्या पलीकडे लोकप्रिय आहे. भाजपला असेही वाटते की मैथिली सर्व जाती आणि वर्गातील महिलांचा पाठिंबा मिळवू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
अलीनगरमधील तिकिट वाटपात भाजप नेते आणि कार्यकर्ते स्थानिक नेत्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आहेत. प्रत्येक बूथ मजबूत करणारे आणि तळागाळात काम करणारे कार्यकर्ते दुर्लक्षित केले गेले आहेत. तारडीह पूर्व मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम झा, तारडीह पश्चिम मंडळ अध्यक्ष पंकज कांत, घनश्यामपूर पूर्व मंडळ अध्यक्ष सुधीर सिंग, घनश्यामपूर पश्चिम मंडळ अध्यक्ष चंदन कुमार ठाकूर, नगर मंडळ अध्यक्ष रणजित कुमार मिश्रा, अलीनगर पश्चिम मंडळ अध्यक्ष गंगा प्रसाद यादव आणि अलीनगर पूर्व मंडळ अध्यक्ष लाल मैथिली यांनी या सर्वांनी निषेध केला आहे. आता भाजपमधील हा अंतर्गत संघर्षाचे मैथिली यांच्यासमोर आव्हान आहे.