बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस – राजदच्या अपप्रचारास नाकारून मतदारांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीस (रालोआ) दणदणीत बहुमत दिले आहे. विशेष म्हणजे मतदानोत्तर कल चाचण्या (एक्झिट पोल) घेणाऱ्या बहुतांशी संस्थांनी याचा अचूक कानोसा घेतला होता.
कामाख्या अॅनालिटिक्स या संस्थेने रालोआस १६७ ते १८७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता, त्यांचे आकडे अंतिम निकालाच्या जवळ जाणारे ठरले आहेत. त्याचप्रमाणे मॅट्रिझ आणि टुडेड चाणक्य या संस्थांनीदेखील अनुक्रमे १४७ – १६७ आणि १४८ – १७२ अशा जागांचा अंदाज देऊन पुन्हा एकदा रालोआच सत्तेत येणार, असे भाकीत केले होते. तेदेखील निकालाच्या जवळ जाणारे ठरले आहे. त्याचवेळी कामाख्या अॅनालिटिक्सने काँग्रेस – राजदच्या महागठबंधनला ५४ ते ७४ आणि टुडेज चाणक्यने ६५ ते ८९ जागांचा अंदाज देऊन सत्तेपासून दूर राहण्याचा स्पष्ट अंदाज दिला होता, तोदेखील खरा ठरला आहे.
लहान पक्षांबाबतचे अंदाज देखील उल्लेखनीयपणे अचूक ठरले. मॅट्रिझने जेएसपी/जेएसयूपीला ५ जागा तर अॅक्सिस माय इंडियाने ०–२ जागा वर्तवल्या होत्या, आणि निकालात तेही बऱ्याच प्रमाणात प्रतिबिंबित झाले आहेत. पीपल्स पल्सने रालोआसाठी १३३–१५९ आणि महागठबंधनसाठी ७५–१०१ अशी आकडेवारी दिली होती.
हा अंदाजही एकूण निकालाशी सुसंगत निघाला. तर भास्कर एक्झिट पोल (१४५–१६० / ७३–९१) ने देखील राज्याचा राजकीय मूड आणि अंतिम निकालाची दिशा अचूकपणे टिपली. याशिवाय पी-मार्क, पोलस्ट्रॅट, पीपल्स इनसाइट अशा अनेक सर्वेक्षण संस्थांनी दिलेल्या विस्तृत आकडेवारीमध्येही एकूण कल पूर्णतः रालोआस सत्ता मिळेल, अशा प्रकारचे होते.
या निवडणुकीत बहुतेक संस्थांनी त्यांच्या सॅम्पलिंग मॉडेल्स, बूथ-स्तरीय कव्हरेज आणि डेमोग्राफिक मॅपिंगवर विशेष भर दिला होता. अशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने केलेली डेटा-आधारित सर्वेक्षणे मतदारांचा कल अचूकतेने टिपण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होतात, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. परिणामी, निवडणुकीपूर्वी आणि निकालापूर्वी एक्झिट पोलला लक्ष्य करणाऱ्या महागठबंधनलाही एकप्रकारे चपराक बसली आहे.