WhatsApp Username Feature File Photo
राष्ट्रीय

Whatsapp Username Feature : व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' समस्येवर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ

मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील युझरनेम 'फिचर'बाबत उत्तर देण्यासाठी यापूर्वी दिली होती ६ जुलैपर्यंतची मुदत

पुढारी वृत्तसेवा

WhatsApp Username Feature : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' (Username) समस्येवर उत्तर देण्यासाठी मेटा (Meta) कंपनीला दिलेली मुदत आणखी वाढवली आहे. आता नवीन मुदत ९ जुलै असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील युझरनेम 'फिचर'बाबत (Feature) उत्तर देण्यासाठी व्हॉट्सॲपला ६ जुलैपर्यंतची मुदत दिली होती.

सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरणाची मागणी

याबाबत हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' या 'फिचर' (Feature) बाबत सविस्तर स्पष्टीकरण मागितल्यानंतर मेटा कंपनीला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे 'युझरनेम' 'फिचर'?

व्हॉट्सॲपने एक 'युझरनेम' फिचर आणले आहे, ज्याद्वारे युझर्सना त्यांचा फोन नंबर शेअर न करताही प्लॅटफॉर्मवर मेसेज करता येऊ शकेल. मेटाने पुढे स्पष्ट केले आहे की, हे 'युझरनेम' युझरच्या प्रोफाइलवर दिसणाऱ्या 'डिस्प्ले नेम' (Display Name) पेक्षा वेगळे आहे. 'डिस्प्ले नेम' हे युनिक (प्रत्येकासाठी वेगळे) असणे बंधनकारक नाही, परंतु 'युझरनेम' मात्र प्रत्येक अकाउंटसाठी युनिक म्हणजेच एकमेव असेल. दरम्यान, या प्रकरणावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत हे 'फिचर' (Feature) भारतात लागू करू नये, असे निर्देश सरकारने मेटा कंपनीला दिले आहेत.

सुरक्षिततेबाबत चिंता आणि गैरवापराचा धोका

हे नवीन 'फिचर' (Feature) आणण्यामागे प्रायव्हसी (गोपनीयता) आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः, दुसऱ्याच्या नावाने बनावट अकाउंट तयार करणे आणि त्याचा गैरवापर होण्याचा धोका वर्तवला जात आहे.

बनावट कॉल्स करण्यासाठी बनावट प्रोफाइल

तज्ज्ञांच्या मते, व्हॉट्सॲपच्या या नवीन 'फिचर'मुळे गुन्हेगार एखाद्याची फसवणूक करण्यासाठी किंवा स्वतःची खोटी ओळख दाखवून बनावट कॉल्स करण्यासाठी बनावट प्रोफाइल तयार करू शकतात. "सर्वात मोठी समस्या ही आहे की, यामुळे कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना (LEAs) गुन्हेगार भारतात आहे की परदेशात, हे शोधणे कठीण होईल. उद्या कोणीही +1 (अमेरिका) कोड असलेला नंबर वापरून व्हॉट्सॲप अकाउंट तयार करू शकतो, कोणाचाही फोटो वापरू शकतो, तशाच प्रकारचे युझरनेम ठेवून फसवणुकीचे कॉल्स करू शकतो. पूर्वी जर नंबर +91 (भारत) ने सुरू होत असेल, तर आम्ही किमान कारवाई सुरू करू शकत होतो. परंतु, जर फोन नंबरच उपलब्ध नसेल, तर अशा प्रकरणांचा तपास करणे जवळजवळ अशक्य असल्‍याचेही तज्ज्ञांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT