West Bengal TMC crisis 
राष्ट्रीय

West Bengal TMC crisis : "त्या पाकिटात काय होते?" : पश्चिम बंगालमधील TMC वादावर 'कॉकरोच'चा सवाल

निवडणूक आयोगाच्या पक्ष चिन्‍ह गोठवण्‍याच्‍या निर्णयावर केली टीका

पुढारी वृत्तसेवा

West Bengal TMC crisis : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. आज दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि ओळख मिळाली आहे. आता या वादात 'कॉकरोच जनता पार्टी'ने उडी घेतली आहे. सौरव दास यांनी भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि बंडखोर तृणमूल काँग्रेस नेत्यांवर उपरोधिक टीका केली आहे.

"त्या पाकिटात काय होते?"

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशाची प्रत शेअर करत 'कॉकरोच जनता पार्टी'चे नेते सौरव दास यांनी विचारणा केली आहे की, "त्या पाकिटात काय भरलेले होते?" विशेष म्हणजे, दास यांची ही टीका बंडखोर गटाला मिळालेल्या 'पाकीट' (Envelope) या निवडणूक चिन्हावर आहे. तृणमूलमधील बंडखोर गटाला निवडणूक आयोगाने आजच पाकीट हे चिन्‍ह जारी केले आहे.. या निर्णयावर भाष्य करताना 'कॉकरोच जनता पक्षा'चे सौरव दास यांनी लिहिले, "तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला 'पाकीट' हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्या पाकिटात काय भरले होते? देशाची पुन्हा एकदा थट्टा झाली आहे."

ममता बॅनर्जींना 'फुटबॉल खेळणारा खेळाडू' चिन्ह; बंडखोर गटाला 'पाकीट' चिन्ह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका संपल्यानंतर काही काळातच ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट पडली होती. पोटनिवडणुकीपूर्वी आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. शुक्रवारी दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे देण्यात आली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नाव 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' ठेवण्यात आले, तर बंडखोर गटाचे नाव 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' असे ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ममता बॅनर्जींच्या गटाला 'फुटबॉल खेळणारा खेळाडू' हे चिन्ह मिळाले, तर बंडखोर गटाला 'पाकीट' हे चिन्ह मिळाले आहे.

रिताब्रत बॅनर्जी यांनी केले निर्णयाचे स्‍वागत, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्‍लाबोल

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जी आणि बंडखोर गट या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. रिताब्रत बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, पक्षाने 'लिफाफा' हे आपले निवडणूक चिन्ह म्हणून निवडण्याला प्राधान्य दिले आणि निवडणूक आयोगाने ही निवड मान्य केली. दरम्यान, संध्याकाळी ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांवरही टीका केली; तसेच, भाजपने आपल्या पक्षावर ताबा मिळवल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT