पश्चिम बंगाल मतदार यादीत २४,१८,६९९ मृत मतदारांची नावे
राज्यात १,३७,५७५ मतदार बनावट
पश्चिम बंगालसाठी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध
West Bengal SIR
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या मसुदा मतदार यादीतून ५८.२ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी निवडणूक आयोगाने आज (दि. १६) मंगळवारी प्रसिद्ध केली. यापैकी सुमारे २४ लाख मतदार मृत आहेत.
पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली आहेत. रद्द केलेल्या नावांची एक स्वतंत्र यादी देखील प्रकाशित केली आहे. वगळलेल्या नावांची यादी अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील मतदार यादीतून सुमारे ५८.८ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. जनगणना आकडेवारीनुसार, पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ५८,०८,२०२ नावे वगळण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या गणनेनंतर वगळण्यासाठी चिन्हांकित केलेल्या नावांची संख्या ५८,०८,००२ होती.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात सध्या २४,१८,६९९ मृत मतदार आहेत, ज्यांची नावे अजूनही यादीत आहेत. याव्यतिरिक्त, १२,०१,४६२ मतदारांचा शोध लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बूथ लेव्हल ऑफिसरने मतदाराच्या घरी ३ किंवा अधिक वेळा भेट दिली आणि त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. अशा व्यक्तीचे नाव बेपत्ता मतदारांच्या यादीत टाकले जाते.या पुनरीक्षण मोहिमेत १९,९३,०८७ असे मतदार देखील आढळले आहेत ज्यांनी आपले पत्ते बदलले आहेत. हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले. त्यांची नावे चुकीच्या पत्त्यावरून वगळली जातील आणि केवळ सत्यापित ठिकाणीच ठेवली जातील.
निवडणूक आयोगाने १,३७,५७५ मतदारांना बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावे मतदार यादीच्या मसुद्यात समाविष्ट केली जाणार नाहीत. आणखी ५७,५०९ मतदारांना इतर श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांना देखील वगळण्यात येईल. आगामी राज्य निवडणुकांपूर्वी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी सुनिश्चित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.