Kolkata Hotel Fire |
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज एका अधिकाऱ्याने वर्तवला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम आणि पोलिस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीची घटना रात्री ८:१५ वाजता ऋतुराज हॉटेलच्या परिसरात घडली. चौदा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक लोकांनी इमारतीच्या खिडक्यांमधून आणि बाल्कनीतून उड्या मारून जीव वाचवला, असे पोलीस आयुक्त वर्मा यांनी सांगितले.
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये एकूण ६० लोक होते. १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ११ पुरुष, एक महिला आणि दोन मुले आहेत. एकूण ८ मृतदेहांची ओळख पटली आहे. यासोबतच १३ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी १२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे वर्मा यांनी सांगितले. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. बचाव कार्य सुरू आहे आणि घटनेची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे वर्मा यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी राज्य सरकारला तातडीने पीडितांना वाचवण्याचे आदेश दिले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा उपायांचे कठोर निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.