Andhra Pradesh |
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवादरम्यान २० फूट लांबीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले. एनडीआरएफ आणि एपीएसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
या घटनेबाबत एसडीआरएफच्या एका जवानाने सांगितले की, ही घटना रात्री अडीच वाजता घडली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एसडीआरएफ जवानाने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. भाजपचे माजी आमदार माधव यांनीही अपघाताची माहिती देताना अक्षय्य तृतीयेदिवशी घडलेली ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार या घटनेची चौकशी करेल आणि पीडितांना भरपाई देईल, असे ते म्हणाले.
भिंत कोसळल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये आणि घटनेत जखमी झालेल्यांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार पहाटे २.३० वाजता जवळजवळ ३० मिनिटे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराची भींत कोसळली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य प्रशासनाच्या पथकांसह बचावकार्य सुरू आहे. वंशपरंपरागत विश्वस्त पूषपती अशोक गजपती राजू यांनी भगवान वराह लक्ष्मी नरसिंह स्वामींच्या पहिल्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच ही घटना घडली.