crime news File Photo
राष्ट्रीय

Crime News: तंत्र-मंत्राच्या नादात कुटुंबाचाच घात? देवघरात पत्नीचा शिरच्छेद करून त्रिशूळासमोर ठेवले, नंतर वडिलांनाही संपवले

पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे कापलेले शीर घरातील देवघरात असलेल्या त्रिशूळासमोर ठेवले. त्यानंतर वडिलांचाही खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोहन कारंडे

Crime News

बांकुरा: पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात एका व्यक्तीने केलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या कृत्याने संपूर्ण देश हादरला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे कापलेले शीर घरातील देवघरात असलेल्या त्रिशूळासमोर ठेवले. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांचाही खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्रातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे.

सोमवारी रात्री बांकुरा जिल्ह्यातील सोनामुखी येथे ही खळबळजनक घटना घडली. मंगल चौधरी असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याने आपली पत्नी रुम्पा चौधरी (३९) आणि वडील राजेंद्र चौधरी (वय ६०) यांची हत्या केली. या दुहेरी हत्येनंतर आरोपी हातात चाकू घेऊन गावात फिरत राहिल्याने परिसरात दहशत पसरली होती.

अंधश्रद्धा आणि तांत्रिक विधीची चर्चा

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल आणि त्याची पत्नी त्यांच्या घरातील देवघरात नियमितपणे पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी करत असत. त्यांच्या घरी एका तांत्रिकाचे येणे-जाणे असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भीषण कृत्यामागे अंधश्रद्धा किंवा तंत्र-मंत्राचा काही संबंध असावा, अशी चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. मात्र, या हत्येमागे नेमके काय कारण होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांची कारवाई आणि आरोपी गजाआड

घटनेची माहिती मिळताच सोनामुखी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत आक्रमक झालेलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT