Viral VideoLeopard attack: महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मात्र यामध्येही बिबट्या हा विषय आपल्यावरचा फोकस काही हटू देत नाहीये. रोज महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या भागातून बिबट्यासंदर्भातील बातमी येते. कधी बिबट्या शहरातच शिरतोय. कधी तो भटकी कुत्री, शेळ्या पळवतोय. तर कधी थेट गोठ्यात घुसून गायी म्हशींचा फडशा पाडतोय.
या बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर इतका वाढला आहे की राज्यात सर्व ग्रामीण भागात लोंक आपली लेकरं बाळं घराबाहेर सोडण्यास धजावत नाहीयेत. शेतातील कामं जीव मुठीत धरून सुरू आहेत. बिबट्याची दहशत बघा... हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांपासून वनमंत्री या बिबट्यांचे करायचे काय याच्यावर डोकेफोड करताना दिसत आहेत. कधी हास्यास्पद उपाय सुचवले जात आहेत तर कधी या बिबटेश भाऊंच्या समोरची हतबलता व्यक्त केली जात आहे.
त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी कसं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वाचा यशस्वी वापर केला जातो याची प्रचिती येते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक बिबट्या काळवीटांच्या कळपावर नजर ठेवून असताना दिसत आहे. जंगलातील एका रस्त्याच्या एका बाजूला हा बिबट्या अत्यंत सावधपणे आपलं सावज टिपण्यासाठी खाली दबा धरून बसला होता. तो आपल्या सावजाचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी एक एक पाऊल अत्यंत दबक्या स्थितीत पुढं टाकत होता.
व्हिडिओ पाहताना बिबट्याची दबकी चाल अन् आपल्याच धुंदीत असलेल्या काळवीटांचे चरणे पाहून असं वाटतं की आता या कळपातील एका तरी काळवीटाचा आता अंत होणार. मात्र तेवढ्यात एका पक्ष्याच्या आवाज ऐकू येतो. त्याचबरोबर ही आपल्याच धुंदीत मस्त असलेली काळवीटे अचानक सतर्क होतात. पक्षी पुन्हा या काळवीटांना सावध करतो. तसंच काळवीट काय धोका आहे याचा कानोसा घेऊ लागतात.
तिकडं दबा धरलेला बिबट्याला आपला प्लॅन या पक्षामुळं फिसटकटल्याची जाणीव होते. आता उपाशी पोटीच झोपावं लागणार या विचारात हा बिबट्या उठतो अन् या सतर्क झालेल्या काळवीटांपासून तोंड फिरवून गवतात नाहिसा होतो....
हा झाला जंगलातला किस्सा... मात्र यावरून माणसानं देखील शिकण्याची गरज आहे. सर्कत राहणं अन् एकमेकांना धोक्याची कल्पना देण्यानं आपण बिबटेश भाऊंचा डाव हाणून पाडू शकतो.