Viral Video Jim Corbett Tiger Reserve
बिजनौर : जगण्यातील प्रत्येक क्षण सजगपणे जगला तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात कराल, हा आध्यात्मिक विचार आपल्याला अनेक संकटांतून वाचवू शकतो. मात्र आपलं जगणं हे बहुतांश वेळा तसं बेसावधच असतं. सतत सजगपणे जगणं ही एक कला आहे, ती सर्वांनाच जमत नाही. तरीही आपल्या जगण्यात काही क्षण निष्काळजीपणे व्यतीत केले, किंवा बेसावध राहिलो तरी काही वेळा माफी मिळते. मात्र जंगलासाठी हा नियम लागू होत नाही. येथे प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या लढाईत पावलोपावली संकटांना सामोरे जात असतो. त्यामुळेच एक बेसावध क्षण आपल्या जीवावर बेतू शकतो, हे आपल्यापेक्षा प्राण्यांना चांगलं कळतं. अशाच एका सावध क्षणाचा व्हिडिओ जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक साकेत बडोला यांनी 'एक्स'वर हा शेअर केला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये जगण्यात सजगपणाचे हेच सूत्र मानवी जीवनालाही तंतोतंत लागू पडते, याची शिकवण देणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
निसर्गाचा थरार आणि वन्यजीवनाचे अकल्पनीय वास्तव समोर आणणारी एक घटना जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात घडली. येथील 'ढिकाला झोन'मध्ये रामगंगा नदीच्या पात्रात एका मगरीने वाघावर अचानक हल्ला केला.
तहानेने व्याकुळ झालेला एक वाघ पाणी पिण्यासाठी रामगंगा नदीच्या काठावर आला होता. वाघ पाणी पिण्यात मग्न असतानाच, पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने क्षणाचाही विलंब न लावता वाघावर झडप घातली. हा प्रसंग इतका अचानक होता की काही काळ पर्यटकांचाही श्वास रोखला गेला. मात्र, वाघाने वार्याच्या वेगाने हवेत उडी घेतली आणि मगरीचा विळखा चुकवला. वाघाने आपल्या चपळाईच्या जोरावर मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका करून घेतली. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक साकेत बडोला यांनी 'X' (ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. "हा व्हिडिओ वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचा एक भाग आहे. ज्या भागात मगरींचे अस्तित्व जास्त असते, तिथे अशा प्रकारच्या चकमकी होणे स्वाभाविक आहे," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
या घटनेनंतर वनविभागाने पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. "जंगल सफारी दरम्यान प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही अडथळा आणू नये," अशा सूचना प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत.