bodybuilder varinder singh ghuman
अमृतसर: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले बॉडीबिल्डर आणि पंजाबी अभिनेता वरिंदर सिंग घुमन यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा आणि मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला आहे.
वरिंदर घुमन यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पुतणे अमनजोत सिंग घुमन यांनी जालंधरमध्ये पत्रकारांना सांगितले की, अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
घुमन यांचे व्यवस्थापक यादविंदर सिंग यांनी सांगितले की, वरिंदर यांना काही दिवसांपासून खांद्याच्या दुखण्याचा त्रास होत होता. याच कारणामुळे तपासणीसाठी त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
पंजाबमधील गुरदासपूर येथे जन्मलेल्या वरिंदर सिंग घुमन यांनी बॉडीबिल्डिंगच्या जगात मोठे नाव कमावले होते. २००९ मध्ये त्यांनी 'मिस्टर इंडिया' चा किताब जिंकला. त्यानंतर त्यांनी 'मिस्टर एशिया' स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, त्यांना दिग्गज बॉडीबिल्डर आर्नाल्ड श्वार्झनेगर यांनी आशियामध्ये आपल्या उत्पादनांचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले होते.
मांसाहाराचे सेवन न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यामुळे घुमन यांची ओळख जगातील पहिले शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर म्हणून होती. त्यांची ही निवड भारतीय फिटनेस समुदायासाठी नेहमीच अभिमानाची बाब ठरली आहे.
बॉडीबिल्डिंगनंतर घुमन अभिनयाच्या क्षेत्रातही उतरले. २०१२ मध्ये त्यांनी 'कबड्डी वन्स अगेन' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय, त्यांनी 'रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स (२०१४)' आणि 'मरजावां (२०१९)' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. नुकतेच, २०२३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'टायगर ३' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली होती, ज्यामुळे त्यांना अधिक ओळख मिळाली.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या घुमन यांनी आपल्या फिटनेस दिनचर्या आणि प्रेरणादायक पोस्ट्समधून अनेक तरुण बॉडीबिल्डिंगच्या तरूणांना प्रेरणा दिली.