उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ file photo
राष्ट्रीय

Vande Mataram : 'युपी'मधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम सक्तीचे करणार : CM योगी आदित्‍यनाथ

वंदे मातरमला विरोध करणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भारताच्या फाळणीमागील एक दुर्दैवी कारणही आहे

पुढारी वृत्तसेवा

CM yogi adityanath On Vande Mataram

लखनौ: "वंदे मातरमला विरोध करणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भारताच्या फाळणीमागील एक दुर्दैवी कारण आहे," असे स्‍पष्‍ट करत उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा आज (दि.१०) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. गोरखपूर येथे 'एकता यात्रा' आणि वंदे मातरम सामूहिक गायन कार्यक्रमात ते बोलत होते.

वंदे मातरमला विरोध राष्ट्रविरोधी मानसिकतेचे प्रतीक

यावेळी योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, राष्‍ट्रीय गीत असणार्‍या वंदे मातरमबद्दल आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत त्याचे गायन सक्तीचे करू. वंदे मातरमला विरोध करणे हे राष्ट्रविरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे. असे विचार आता सहन केले जाणार नाहीत, असेही त्‍यांनी सांगितले.

जिना प्रवृत्तीला जिवंत गाडू

वंदे मातरमला विरोध करणारे लोक सरदार पटेल यांच्या जयंती समारंभांना उपस्थित राहत नाहीत; परंतु जिना यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. देशात जिना प्रवृत्तीने पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला येथे जिवंत गाडून टाकू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

... तर देशाची फाळणी झाली नसती

१८९६-९७ मध्ये याच काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः संपूर्ण वंदे मातरम गायले होते आणि १८९६ ते १९२२ पर्यंत प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम गायले जात होते. तथापि, १९२३ मध्ये, जेव्हा मोहम्मद अली जौहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा वंदे मातरम गायला सुरुवात होताच ते उभे राहिले आणि निघून गेले. त्यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. वंदे मातरमला अशा प्रकारचा विरोध भारताच्या फाळणीचे दुर्दैवी कारण बनले. काँग्रेसने त्यावेळी मोहम्मद अली जौहर यांना राष्ट्रपती पदावरून काढून टाकले असते आणि वंदे मातरमद्वारे भारताच्या राष्ट्रवादाचा आदर केला असता, तर भारताचे विभाजन झाले नसते, असा दावा त्‍यांनी केला.

वंदे मातरमच्‍या १५० व्या वर्षाच्या स्मृतीदिनानिमित्त राष्‍ट्रव्‍यापी उत्सवास प्रारंभ

दरम्‍यान, वंदे मातरम राष्‍ट्रीय गीताच्‍या १५० व्या वर्षाच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर २०२४ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा उत्‍सव साजरा केला जाणार आहे. ७ नोव्‍हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रव्‍यापी उत्सवास प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "हा उत्सव देशातील अनेक नागरिकांना नवीन प्रेरणा देईल. "वंदे मातरम् हे भारताच्या एकतेचे खरे प्रतीक आहे कारण ते अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. मी या प्रसंगी माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींचे अभिनंदन करतो. आज आपण 'वंदे मातरम्'ची १५० वर्षे साजरी करत असताना, हे आपल्याला नवीन प्रेरणा देईल आणि देशातील लोकांना नवीन उर्जेने भरेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT