Vaishno Devi Yatra New Year 2026: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड झुंबड उडते. त्यामुळं नवीन वर्षाचे औचित्य साधून माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने काही नवे नियम लागू केले आहेत. त्यामुळं जर तुम्ही नवीन वर्षाची सुरूवात वैष्णोदेवीच्या दर्शनाने करू इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
आता भाविकांना रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डीवाईस (RFID) कार्ड जारी झाल्यानंतर वैष्णोदेवीची यात्रा १० तासात सुरू करावी लागणार आहे. त्याचबरोबर ही यात्रा आता २४ तासात पूर्ण करावी लागणार आहे. हे निर्देश तत्काळ लागू करण्यात आले असून याची अमलबजावनी त्वरित होणार आहे.
माता वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी नोंदणी आणि RFID यात्रा कार्ड घेणे यापूर्वीच सक्तीचं करण्यात आलं आहे. यापूर्वी RFID कार्डची वैधता १२ तास होती. म्हणजे यापूर्वी भाविक त्या १२ तासात कधीही आपली यात्रा सुरू करू शकत होता. तसेच यात्रा पूर्ण करण्यासाठी कोणताही निश्चित वेळ नव्हता.
मात्र नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची संध्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्राईन बोर्डने भाविकांसाठी स्पष्ट निर्देश जारी केली आहेत. भाविक पायी जाणार असले, हेलिकॉप्टर किंवा बॅटरीच्या कारमधून जाणार असले तरी नोंदणी केंद्रांवर असलेल्या अधिकाऱ्यांना या नव्या निर्देशांबाबत आणि वेळेच्या बंधनाबाबत भाविकांना सतत सुचना देण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तीन-चार दिवस आधी भाविकांची वैष्णोदेवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट विचारात घेऊन सुरक्षा आणि व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी टाईम स्लॉटचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना असं वाटतं की या निर्णयामुळं यात्रा मार्गावर भाविकांची ये-जा चांगल्या प्रकारे संचालित करता येईल.
धर्मनगरी सहित माता वैष्णोदेवीच्या दरबार या ठिकाणी रविवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या मध्यम सरी पडल्या. दुपारी २ वाजल्यानंतर वेगवान हवा आणि पावसामुळं हेलिकॉप्टर सेवा बाधित झाल्या. ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या भाविकांना देखील समस्यांचा सामना करावा लागला. सायंकाळी जवळपास १६ हजार ५०० भाविक हे भवनाकडे रवाना झाले होते. या महिन्यात आतापर्यंत जवळपास ३.२० लाख आणि वर्षात जवळपास ६७.२५ लाख भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे.