Vaishno Devi Fake Silver Scam: जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीत मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 20 टनांहून अधिक चांदीत भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जम्मू न्यायालयाने पोलिसांना संपूर्ण नोंदी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी श्री माता वैष्णो देवीच्या दरबारात वर्षानुवर्षे अर्पण केलेल्या 20 टनांहून अधिक चांदीची बाजारातील किंमत सुमारे 550 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मंदिर प्रशासनाने ही चांदी वितळवण्यासाठी पाठविल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
तपासणीदरम्यान वितळलेल्या धातूमध्ये केवळ 5 ते 6 टक्केच शुद्ध चांदी आढळली, तर उर्वरित धातूमध्ये कॅडमियम, लोखंड आणि इतर मिश्रधातूंचे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बनावट किंवा भेसळयुक्त चांदी मंदिरात अर्पण करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणानंतर जम्मूचे वकील दीपक शर्मा यांनी 9 मे रोजी क्राइम ब्रँचचे पोलिस महानिरीक्षक (IG) आणि आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली.
या तक्रारीत मंदिरात अर्पण झालेल्या चांदीत भेसळ करण्यात आली असावी किंवा मूळ चांदीची अदलाबदल झाली असण्याची शक्यता व्यक्त करत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतरही तपासात कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने दीपक शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी एफआयआर नोंदवून निष्पक्ष तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.
न्यायालयाच्या निर्देशानंतर क्राइम ब्रँचने सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये, हे प्रकरण क्राइम मुख्यालय श्रीनगरकडून मंजुरीसाठी झोनल पोलिस मुख्यालय, जम्मू येथे पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, याचिकाकर्त्याने या भूमिकेवर आक्षेप घेत आर्थिक गुन्हे शाखेचे स्वतःचे पोलिस ठाणे असल्याने त्यांनी थेट कारवाई करणे आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले.
तसेच, या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली याचा उल्लेखही अहवालात नसल्याचा दावा करण्यात आला. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत जम्मूचे मुख्य न्यायिक दंडाधिकारी (Chief Judicial Magistrate) यांनी तपास अधिकाऱ्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि नोंदींसह 29 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, मंदिरात अर्पण केलेल्या चांदीमध्ये नेमकी भेसळ झाली की मूळ चांदीची अदलाबदल करण्यात आली, याचा उलगडा आता न्यायालयीन देखरेखीखाली होणाऱ्या तपासातून होणार आहे.