E20 Petrol Controversy: 48 तासांत कारचं मायलेज 17 वरून थेट 5 वर; व्लॉगर सौरभ जोशीने E20 पेट्रोलवर उपस्थित केले प्रश्न

E20 Petrol Controversy: प्रसिद्ध युट्यूबर सौरव जोशीने E20 पेट्रोलमुळे त्याच्या मर्सिडीज कारचे मायलेज मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा केला आहे.
E20 Petrol Controversy Sourav Joshi
E20 Petrol Controversy Sourav JoshiPudhari
Published on
Updated on

E20 Petrol Controversy: देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलबाबत सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध युट्यूबर सौरव जोशीने मर्सिडीज-बेंझ एसयूव्हीच्या मायलेजमध्ये मोठी घट झाल्याचा दावा करत E20 पेट्रोलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून मर्सिडीज-बेंझ कंपनी आणि केंद्र सरकारनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

48 तासांत मायलेज 17 वरून थेट 5 किमीपर्यंत घसरल्याचा दावा

उत्तराखंडमधील प्रसिद्ध युट्यूबर सौरव जोशीने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्ह्लॉग शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या मर्सिडीज-बेंझ एसयूव्हीच्या डॅशबोर्डवरील मायलेज दाखवत अवघ्या 48 तासांत गाडीचे मायलेज 17 किमी प्रति लिटरवरून 9 आणि नंतर केवळ 5 किमी प्रति लिटरपर्यंत घसरल्याचा दावा केला.

मात्र, त्याने दाखवलेले आकडे हे गाडीचे सरासरी (Average) मायलेज होते की त्या क्षणाचे रिअल-टाइम मायलेज, हे स्पष्ट झालेले नाही. वाहन चालवण्याची पद्धत, वाहतूक, रस्त्याची परिस्थिती आणि स्पीड यानुसार रिअल-टाइम मायलेजमध्ये मोठा फरक पडू शकतो.

E20 पेट्रोल जबाबदार?

सौरव जोशीने या घसरणीमागे स्थानिक पेट्रोल पंपावर मिळणारे E20 पेट्रोल कारणीभूत असल्याचा दावा केला. फुल टँक भरल्यानंतर पूर्वी गाडी सुमारे 800 किलोमीटरची रेंज दाखवत होती, मात्र आता ती केवळ 480 किलोमीटरची रेंज दाखवत असल्याचे त्याने सांगितले.

त्यांने इंजिनच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत असलेली त्याच्या पत्नी आणि कंटेंट क्रिएटर अवंतिका भट्टनेही इतक्या महागड्या गाडीमध्ये अशी समस्या निर्माण होणे चिंताजनक असल्याचे म्हटले.

सोशल मीडियावर चर्चा

सौरव जोशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याच्या अनुभवाला दुजोरा दिला, तर अनेक वाहनप्रेमींनी आणि तज्ज्ञांनी केवळ रिअल-टाइम मायलेजच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.

मर्सिडीज-बेंझचे स्पष्टीकरण

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मर्सिडीज-बेंझ इंडियाने अधिकृत निवेदन जारी केले. कंपनीच्या मते, ग्राहकांची सुरक्षितता, वाहनाची विश्वासार्हता आणि उत्कृष्ट कार्यक्षमता ही त्यांची प्राथमिकता आहे. त्यामुळे E20 पेट्रोलमुळे BS6 मर्सिडीज वाहनांना कोणताही तांत्रिक धोका नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

E20 Petrol Controversy Sourav Joshi
Post Office Scheme: फक्त एक काम करा... तुम्हाला सरकारी योजनेत मिळतील 16 लाख रुपये, काय आहे योजना?

सरकारचाही E20 वर भर

केंद्र सरकार देशभरात E20 पेट्रोलचा वापर वाढवण्यावर भर देत आहे. सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, कच्च्या तेलावरील आयातीचे अवलंबित्व घटेल आणि देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल.

सरकारने हेही स्पष्ट केले की, E20 पेट्रोलमुळे काही वाहनांमध्ये मायलेजमध्ये 3 ते 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मात्र, त्यामुळे इंजिन खराब होते किंवा वाहनाचे नुकसान होते, असे कोणतेही अधिकृत वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

नितीन गडकरींचेही स्पष्ट मत

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत असल्याच्या दाव्यांचे खंडन केले होते. त्यांनी अशा दाव्यांना कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगत, E20 मुळे वाहनांचे नुकसान झाल्याचे प्रमाणित उदाहरण असल्यास ते समोर आणण्याचे आव्हानही केले होते.

E20 Petrol Controversy Sourav Joshi
Jejuri Wari Accident: आषाढी वारीवर दु:खाचा डोंगर! जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; सहा जण जखमी

याआधीही वाद झाला होता

याआधी बिहारमधील युट्यूबर आणि जन सुराज पक्षाचे नेते मनीष कश्यप यांनीही त्यांच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या मायलेजबाबत आणि वाहनाच्या काही भागांच्या नुकसानीबाबत E20 पेट्रोलवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, टोयोटाने त्या प्रकरणात दूषित (Contaminated) पेट्रोल हेच मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले होते.

सध्या E20 पेट्रोलबाबत ग्राहकांचे अनुभव, वाहन उत्पादक कंपन्यांचे स्पष्टीकरण आणि सरकारची भूमिका यामुळे हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, भविष्यात याबाबत अधिक तांत्रिक माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news