Uttarakhand BJP Mission 2027 Election Strategy 
राष्ट्रीय

Mission 2027 : BJPचा 'मास्टरस्ट्रोक'! उत्तराखंडात २०२२मध्‍ये गमावलेल्या २३ जागांसाठी बड्या नेत्यांची फौज उतरणार मैदानात!

खातीमा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी सांभाळणार

पुढारी वृत्तसेवा

Uttarakhand BJP Mission 2027 Election Strategy : उत्तराखंडमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी भाजपने ‘मायक्रो-मॅनेजमेंट’ (सूक्ष्म नियोजन) रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून २०२२ च्या निवडणुकीत गमावलेल्या २३ मतदारसंघांमधील संघटनात्मक कामांची जबाबदारी पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्यांवर सोपवली आहे.

मुख्यमंत्री धामी स्वतः सांभाळणार खातीमा मतदारसंघाची जबाबदारी

मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याकडे त्यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेला 'खातीमा' सोपवण्यात आला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत धामी यांना या जागेवरून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता धामी या मतदारसंघात पक्षाच्या उपक्रमांची पाहणी करतील, राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे. २०२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी सक्रिय राहतील.

२०२२ मधील पराभूत जागांवर विशेष लक्ष

पक्षांतर्गत वर्तुळात वाढती सत्ताविरोधी लाट (Anti-incumbency) आणि विशेषतः 'जेन झी' मतदारांमधील नाराजीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. २०२२ च्या निवडणुकीत भाजपने गमावलेल्या २३ जागांपैकी १९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता, तर बहुजन समाज पक्ष (BSP) आणि अपक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, " उत्तराखंडमध्‍ये नियुक्त केलेले नेते आपापल्या मतदारसंघात दौरे करतील. याचचेळी स्थानिक राजकीय समीकरणांचा अभ्यासही करतील. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून २०२७ मधील विजयासाठी रणनीती आखणार आहेत."

खातीमा की चंपावत? धामी यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तराखंडमधील ७० पैकी ४७ जागांवर दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखली होती. मात्र, मुख्यमंत्री धामी यांचा स्वतःच्या खातीमा मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी चंपावत पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवून आपले मुख्यमंत्रीपद कायम ठेवले. मात्र आता धामी हे पुन्‍हा एकदा खातीमा मतदारसंघात सक्रीय आहेत. तेथील स्थानिक नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे तेथील समस्या सोडवण्यासाठी ते सहज वेळ देऊ शकतात. दरम्यान, २०२७ च्या निवडणुकीत धामी यांनी खातीमा येथून लढावे की चंपावत येथून, याचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व निवडणुकीच्या काळात घेईल. मात्र, पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते, त्यांनी चंपावत येथूनच निवडणूक लढवावी, असा एक प्रवाह आहे.

मुस्लिमबहुल व आव्हानात्मक जागांवर विशेष लक्ष

भाजपने कधीही न जिंकलेल्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या जागांवरही बड्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे:पिरान कलियर (हरिद्वार): भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार महेंद्र भट्ट यांच्याकडे या मुस्लिमबहुल मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. या जागेवर भाजपने आजवर कधीही विजय मिळवलेला नाही; २०१२ पासून येथे काँग्रेसचे फुरकान अहमद आमदार आहेत. तसेच मंगलौर या मुस्लिमबहुल आणि आव्हानात्मक मतदारसंघाची धुरा राज्यसभा खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष नरेश बन्सल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या जागेवर आतापर्यंत फक्त बसपा आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. तर चक्राता व धारचुला या मतदारसंघांत भाजपने कधीही न जिंकलेल्या जबाबदारी अनुक्रमे पक्ष सरचिटणीस दीप्ती रावत आणि वरिष्ठ नेते गणेश भंडारी यांच्याकडे दिली आहे. गढवालचे खासदार अनिल बलोजी यांच्याकडे बद्रीनाथ मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. २०२२ मध्ये या जागेवरून प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांचा पराभव झाला होता.याव्यतिरिक्त, केंद्रीय राज्यमंत्री अजय टमटा, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल 'निशंक', त्रिवेंद्रसिंग रावत आणि तीरथसिंग रावत यांसारख्या इतर दिग्गजांचाही या २३ मतदारसंघांच्या यादीत समावेश आहे.

पक्षाला तळागाळात मजबूत करण्‍यावर भर

हरिद्वार ग्रामीण मतदारसंघाची जबाबदारी मिळालेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस कुंदन परिहार म्हणाले, "हा संपूर्ण उपक्रम पक्षाला तळागाळात मजबूत करण्यासाठी आखण्यात आला आहे. हे नेते आपापल्या मतदारसंघांचा दौरा करतील, बूथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या बैठका घेतील आणि सर्व राजकीय आव्हानांचा आढावा घेतील. या नव्या आराखड्यानुसार माजी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि वरिष्ठ नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये आणि मोहिमांमध्ये जनतेचा थेट सहभाग कसा वाढेल, याचीही काळजी घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT