

Youngest Chartered Accountant In The World : ज्या वयात बहुतांश तरुण आपल्या करिअरचे पर्याय शोधत असतात, अशा वयात लक्ष्मणन मय्यप्पन याने व्यावसायिक अकाउंटन्सीची उच्च पदवी संपादन केली आहे. लक्ष्मणन मय्यप्पन याला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने जगातील सर्वात तरुण पुरुष 'चार्टर्ड अकाउंटंट' (CA) म्हणून मान्यता दिली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, त्याने दुबईत वयाच्या अवघ्या १६ वर्षे १४१ दिवसांचा असताना हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्याचा फायनान्स (वित्त) क्षेत्रातील हा प्रवास कोविड-१९ च्या काळात, दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच सुरू झाला. वयाच्या १५ व्या वर्षी त्याने 'ACCA' (असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स) या पदवीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या वर्षभरात ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली.त्यानंतरही लक्ष्मणनने आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक घोडदौड सुरूच ठेवली. त्याने 'CFA' (चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट) ही पदवीही प्राप्त केली असून सध्या तो फायनान्स विषयात 'MSc' करत आहे. सध्या तो दुबईतील 'सेन्चुरी फायनान्शियल' कंपनीत वरिष्ठ संशोधन विश्लेषक म्हणून कार्यरत असून, तेथे तो गुंतवणूक, संशोधन, विश्लेषण आणि आर्थिक बाजारातील महत्त्वाच्या निर्णयांवर काम करतो.
कोविड काळातील लॉकडाउदरम्यान लक्ष्मणनला अकाउंटिंग विषयात रस निर्माण झाला. 'पीडब्ल्यूसी अकॅडमी'च्या (PwC Academy) एका जुन्या अहवालानुसार, लक्ष्मणनच्या आईने स्वतः ACCA आहेत. त्याला लॉकडाउन काळताअकाउंटिंगच्या मूलभूत संकल्पनांची ओळख करून दिली होती. त्यानंतर त्याने स्वतः ही पदवी घेण्याचा निर्णय घेतला. इतक्या लहान वयात ACCA पूर्ण करूनच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने CFA पदवी प्राप्त केली आणि आता तो फायनान्स क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहे.
अभ्यास आणि फायनान्सव्यतिरिक्त त्याला इतर गोष्टींचीही आवड आहे. लक्ष्मणन आपल्या मोकळ्या वेळेत घड्याळांचे डिझायनिंग (Watch Designing) आणि निर्मिती करण्याचे काम करतो.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या सन्मानाबद्दल बोलताना लक्ष्मणन म्हणाला, "हा टप्पा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मी या शैक्षणिक पदव्यांकडे कधीही एक शर्यत म्हणून पाहिले नाही. माझ्यासाठी प्रत्यक्ष जगात फायनान्स कसे काम करते हे समजून घेणे आणि दीर्घकाळ उपयुक्त ठरणारे कौशल्य आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे होते. जेव्हा तुमचे शिकणे हे घाईपेक्षा उत्सुकतेने प्रेरित असते, तेव्हा त्याचा परिणाम अधिक अर्थपूर्ण मिळतो."त्याचा हा प्रवास शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी लगेचच व्यावसायिक पदव्यांचा पर्याय कसा निवडू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे. केवळ एका पदवीवर न थांबता लक्ष्मणनने फायनान्स क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेण्यासोबतच आपले शिक्षण सुरू ठेवले आहे.