Accident Pudhari
राष्ट्रीय

UP SUV Accident: ३० मिनिटे, २० किमी थरार: १०० किमी वेगाने धावणाऱ्या SUV ने ३ जणांना चिरडले, २ गंभीर

ताशी १०० किमी वेगाने धावणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या SUV ने २० किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल तीन दुचाकींना उडवले.

मोहन कारंडे

UP SUV Accident:

मेरठ : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एका सुसाट कारने अक्षरशः मृत्यूचे तांडव घातले. ताशी १०० किमी वेगाने धावणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या SUV ने २० किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल तीन दुचाकींना उडवले. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. सुमारे ३० मिनिटे चाललेल्या या थरारामुळे महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले होते.

शहरातून महामार्गापर्यंत मृत्यूचा प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास सिव्हिल लाइन्स परिसरातील बहेडी मोड येथे सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग इतका प्रचंड होता की चालकाचे वाहनावर नियंत्रण नव्हते. पहिल्या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकाने बदायूं-बरेली राज्य महामार्गावर गाडी घातली आणि समोर येणाऱ्या दुचाकींना धडक दिली.

एकामागून एक तीन अपघात

सिव्हिल लाइन्स परिसरात कारने पहिल्या दुचाकीला उडवले. यामध्ये बरेलीचे रहिवासी मुकेश (२५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे मेहुणे मदनलाल (५०) जखमी झाले. पहिल्या अपघातानंतर चालक पळून जात असताना महामार्गावर २० वर्षीय विशाल सिंह याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. यात विशालचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढे गेल्यावर रोशन नगर वळणावर कारने तिसऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ५५ वर्षीय बदलू यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र शान मोहम्मद गंभीर जखमी झाला.

'चालक पळ काढण्यासाठी वेगाने गाडी चालवत होता'

"आम्ही आमच्या दुचाकीवरून जात असताना अचानक मागून आलेल्या SUV ने आम्हाला उडवले. धडक इतकी जोरात होती की आम्ही दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळलो. लोकांनी ओरडून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालक वेगाने पळून गेला," असे जखमी मदनलाल यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांच्या मते, पहिल्या अपघातानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी चालक ९० ते १०० च्या वेगाने नागमोडी वळणे घेत गाडी चालवत होता. या घटनेनंतर बदायूं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT