

सोलापूर : शहरातील रुपाभवानी चौकात सोमवारी (दि. 16) पहाटे तीनच्या सुमारास आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. घटना समजताच तरुणांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. हाताला आलेली घरातील तरुण मुले अचानक गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नागेश प्रकाश गवंडी (वय 27, रा. रविवार पेठ), रोहन अशोक कोरेे (वय 23, रा. श्रीशैल नगर, भवानी पेठ) आणि बसवराज सुनील चनशेट्टी (वय 25, रा. बाळशेट्टी नगर, शेळगी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची नावे आहेत.
सोमवारी पहाटे हे तिघे तरुण एकाच दुचाकीवरून (एम.एच.13 ई.आर. 0627) जात होते. रुपाभवानी चौकातील कचरा संकलन केंद्रासमोर आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे हवालदार आर. डी. दुधाळे यांनी तिघांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी तिघेही मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर चालक टेम्पोसह पसार झाल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दुपारी पोलिसांनी टेम्पोची माहिती मिळवली. निर्जन भागात टेम्पो सोडून चालक फरार झाला आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय विष्णू गायकवाड करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. घरातील कर्ती तरुण मुले गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शासकीय रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश केला. तीनही तरुण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत होते. नागेश गवंडी टोलनाक्यावर काम करीत होता. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहेत. रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे, तर बसवराज चनशेट्टी पुण्यातील फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ आहे.