

Bike Bullock Cart Accident Umarkhed
यवतमाळ : घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच एका भीषण अपघाताने बंडेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या लहान भावाच्या दुचाकीस्वाराला एका बैलगाडीची जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते खरूस मार्गावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या बैलगाडी चालकाला शोधून काढण्यात उमरखेड पोलिसांना यश आले आहे.
माधव मारोती बडेवार (रा. बिटरगाव, ता. उमरखेड) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी घराबाहेर पडले होते. पत्रिका वाटप संपवून ते आपल्या मोटरसायकलने ढाणकी ते खरूस रस्त्याने घरी परतत असताना समोरून येणाऱ्या एका बैलगाडीची त्यांच्या गाडीला जोराची धडक बसली. यात माधवचा जागीच मृत्यू झाला.
मात्र, अपघाताची माहिती पोलिसांना देणे किंवा जखमीला मदत करणे सोडून, बैलगाडी चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयित साहेबराव गलेवाड याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याची बैलगाडी जप्त केली आहे. "रस्त्यावर वाहन चालवताना निष्काळजीपणा करणे आणि अपघात झाल्यावर जखमीला सोडून पळून जाणे हा गंभीर गुन्हा आहे," असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.