US - India Trade Deal :
भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक दिवसांपासून ट्रेड डीलचं भिजत घोंगडं पडलं आहे. मात्र आता यावरील तोडगा दृष्टीपथात असल्याचे सुतोचवाच केंद्रीय व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी दिले. त्यांनी सांगितलं की इंडिया युएस ट्रेड डीलवर दोन्ही देशांच्यामधील चर्चा वेगानं पुढं जात आहे. भारताची चर्चा करणारी एक टीम सध्या अमेरिकेत आहे. त्यांच्या सतत बैठका होत आहेत.
व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापार चर्चेदरम्यान सांगितलं की भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डीलबाबत सक्रीय चर्चा सुरू आहे. आम्ही गेल्या तीन वर्षात अनेक विकसीत देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. आम्ही अमेरिका, युरोपीय संघ, चिली, पेरू, न्यूझीलँड आणि ओमानसोबत व्यापार कराराबाबत चर्चा करत आहोत.
पियूष गोयल यांनी ब्राझीलसोबतच्या कराराबाबत सांगितलं की भविष्यात दक्षिण अमेरिकेच्या बाजारात भारताची एन्ट्री ही सोपी करण्यात येणार आहे.
दरम्यान, भारताचे व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय टीम सध्या अमेरिकेतील आपल्या समपदस्थांसोबत चर्चा करत आहे. ते सध्या वॉशिंग्टनमध्ये उपस्थित आहेत. ते सतत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. ट्रेड डीलवर विचार विनिमय होत आहे. या सर्व चर्चेला अंतिम स्वरूप देण्यासाठी १७ ऑक्टोबरला भारताचं एक शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे असं देखील पियूष गोयल यांनी सांगितलं.
बुधवारी झालेल्या व्यापार डेटा ब्रिफिंगवेळी व्यापार सचिवांनी सांगितलं की अमेरिकेसोबत भारताची उर्जा खरेदी ही २२ ते २३ अब्ज डॉलर पर्यंत पोहचली आहे. यापुढं देखील यात १२ ते १३ अब्ज डॉलरची वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतची चर्चा थंडावली होती. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकेकडून कच्च तेल आयात करतो म्हणून भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला होता.
दरम्यान, यानंतर पुन्हा ट्रेड डीलवर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या या चर्चेचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. ट्रेड डीलबाबत आतापर्यंत पाच स्तरांवर चर्चा झाली आहे. मात्र यात ऑगस्ट महिन्यात खंड पडला होता. आता चर्चेला पुन्हा वेग आला आहे. गेल्या महिन्यात गोयल यासाठीच न्यूयॉर्कमध्ये गेले होते.