मेरठ: बरेलीमध्ये शनिवारी रात्री एका ५० वर्षीय शेतकऱ्याची हातोड्याने वार करून हत्या केलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत शेतकऱ्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे दोघांनी मिळून हत्येचा कट रचला होता, असे पोलिस तपासात उघडकीस आले.
सुरेशपाल सिंह (वय ५०) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी ममता देवी (वय ३०) आणि तिचा प्रियकर होतम सिंह (वय २६) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता देवी ही मूळची बिहारची आहे. बरेली येथील सुरेशपाल सिंह यांच्यासोबत तिचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. ममता आणि रोजंदारीवर काम करणारा होतम यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेशपालला या प्रकरणाची माहिती मिळाली होती, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत आणि होतमसोबतही त्याचे वाद झाले होते.
सुरेशपाल हे संबंध थांबवण्यासाठी ममताला मारहाण करत होता. त्यामुळे तिने त्याला संपवण्याचा कट रचला. शनिवारी रात्री तिने पती सुरेशपाल झोपलेला असताना त्याला खाटेवरच घट्ट पकडून ठेवले. यावेळी तिने आधीच बोलावलेल्या प्रियकर होतम सिंह याने हातोड्याने सुरेशपालच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर घाव घातले. यामध्ये सुरेशपालचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर होतम पळून गेला, तर ममता घरातच थांबली.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ममताने तिचा ११ वर्षांचा मोठा मुलगा अर्जुन याला उठवले आणि त्याला गावच्या सरपंचांना माहिती द्यायला सांगितली. ममताने गावकऱ्यांसमोर ती बाथरूमला जाण्यासाठी उठली असता तिला पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याचे नाटक करू लागली. दरम्यान, तिने कॉल रेकॉर्ड पुसून टाकण्यासाठी आपल्या फोनचे सिम कार्ड काढून टाकले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ममताला रडू कोसळले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या आधारे तिला अटक करण्यात आली. तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.