Ghaziabad News
गाझियाबाद : गाजियाबादमधील गोविंदपूरममध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत अविनाश आणि त्याची बहीण अंजली यांचं आत्महत्येचं प्रकरण आता आणखीनच गंभीर वळणावर आलं आहे. पोलिसांना अंजलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेलं २२ पानांचं सुसाइड नोट सापडलं आहे. या नोटमध्ये तिने आपल्या वडिलांवर आणि सावत्र आईवर मानसिक छळाचा आरोप करत "तुम्हाला पप्पा म्हणायला नको वाटतं... माझ्या मृतदेहालाही हात लावू नका" असे लिहिले आहे.
अंजलीने लिहिले आहे की, "आमच्या मृत्यूला सावत्र आई आणि वडील यांच्याशिवाय इतर कोणीही जबाबदार नाही. माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफवर माझ्या मित्राचा हक्क असेल. माझ्या चितेला आई आणि वडील यांनी हात लावू नये. माझ्या चितेला केवळ माझा मित्र महिमच अग्नी देईल," असेही तिने स्पष्ट लिहिले आहे. अंजलीने सुसाईड नोटच्या पानांचे फोटो वडील सुखवीर सिंग, सावत्र आई आणि मावशी रेखा राणी यांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. या भाऊ-बहिणीने गुरुवारी आत्महत्या केली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला होता आणि पोलिसांनाही सुसाईड नोट सापडली नव्हती. मात्र, शुक्रवारी खोलीची झडती घेतली असता पोलिसांना डायरीतील ही सुसाईड नोट सापडली.
सुसाईड नोटमध्ये अंजलीने लिहिले आहे की, "समाजाच्या रीतीरिवाजांसाठी वडील सुखवीर सिंग आणि त्यांची पत्नी रितू आमचा मानसिक छळ करत होते. रितू देवीच्या चतुराईपुढे वडिलांनी स्वतःची बाजू मांडणे व्यर्थ होते, कारण ते तिच्यावरच विश्वास ठेवायचे." तिने पुढे लिहिले, "...बाबा, मुलांना फक्त जन्म देणे आणि शाळेची फी भरणे एवढेच पालकत्व नसते, तर त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे हे देखील महत्त्वाचे असते. माझ्या भावाने खूप मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली. पण त्याचा इतका छळ केला की, तो मित्रांसोबत फिरायलाही जाऊ शकत नव्हता. सुखवीर सिंग, तुम्हाला 'पापा' म्हणायला आता चांगलं वाटत नाही. तुम्हाला माझ्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटला. तुम्हाला तुमची पत्नी मुबारक असो."
अंजलीने लिहिले की, तिच्या सावत्र आईने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, तिला बदनाम केले आणि वाईटसाईट बोलली. "अशावेळी माझे वडील गप्प राहिले आणि माझे काहीही ऐकून घेतले नाही. काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि आई-वडिलांबद्दल असे लिहीत आहे. पण त्या सावत्र आईसोबत १६ वर्षे कशी काढली आहेत, हे मलाच माहीत आहे. तिचे दुःख माझ्या भावालाही तितकेच होते."
अंजलीने सुसाईड नोटमध्ये सावत्र आईला इशारा दिला आहे की, "मी तुझ्या कारस्थानांना आणि चतुराईला ओळखून आहे. त्यामुळे डायरीतील ही पाने फाडू नकोस, कारण याचे फोटो काढून मी अनेकांना पाठवले आहेत. तुझी चतुराई पकडली जाईल. जर मी एकटी मेले असते, तर माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित झाले असते. आम्ही दोघे भाऊ-बहीण मानसिक तणावात आहोत. आता समाजात मान वर करून जगून दाखव."
अंजलीने तिचा मित्र महिम याच्यासाठी लिहिले, "महिम, आता सर्वकाही तुझ्या हवाली. मी हे जग सोडून जात आहे. तूच मला मुखाग्नी देणार. माझ्या आई-वडिलांना किंवा इतर कोणालाही माझ्या मृतदेहाला हात लावू देऊ नकोस. तू माझा शुभचिंतक आहेस. माझ्या खात्यातील सर्व पैसे तू ठेव. ही माझी छोटीशी मदत आहे." अंजली नोएडा येथील एका एक्सपोर्ट कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत होती आणि महिम तिचा ग्राफिक डिझायनर मित्र असल्याचे समजते.
शवविच्छेदन गृहाबाहेर बसलेले वडील सुखवीर सिंग म्हणाले, "माझं तर सर्वस्व लुटलं गेलं. दोन्ही मुलांचे मृतदेह घेऊन घरी कसं जाऊ? ज्या मुलांसाठी मी दुसऱ्या पत्नीपासून मूल होऊ दिलं नाही, त्यांनीच आज मला समाजात कलंकित केलं. मुलगा हुशार होता, आयबीमध्ये अधिकारी झाला. आम्ही कोणासाठी कमावत होतो? आता हे सर्व कोणाला देणार? आम्ही त्यांना सरकारी नोकरीसाठी सांगत होतो, पण दबाव टाकला नाही. त्यांनी आत्महत्या का केली, हे मला माहीत नाही. मुलं काय मेली, आता मीच मेल्यासारखा झालो आहे."