

बंगळूर : धर्मस्थळातील महिलांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात तक्रारदाराने दर्शविलेल्या ठिकाणी सांगाड्यांचा शोध घेण्यासाठी उत्खनन सुरू आहे. दरम्यान तक्रारदाराने आणखी एक स्फोटक विधान केले असून, एका शालेय विद्यार्थिनीचे तिच्या शालेय दप्तरासह दफन केले होते, असे त्याने म्हटले आहे.
एसआयटी चौकशीत तक्रारदाराने सांगितले की, एका मुलीचा कपडे न घातलेला मृतदेह मी पाहिला. तिचे वय 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान होते. तिच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या स्पष्ट खुणा होत्या. तिच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणाही होत्या. त्यांनी मला खड्डा खणण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या शाळेच्या बॅगेसह तिला पुरण्यास सांगितले. ती घटना आजही मला सतावते.
तक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे, एसआयटीने तपास अधिक तीव्र केला आहे. एसआयटी अधिकारी शाळकरी मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती गोळा करत आहेत. 2010 मध्ये एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. धर्मस्थळाच्या बेळतांगडी भागातील शाळांमधून मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत अधिकारी माहिती गोळा करत आहेत. भागातील पोलिस स्थानकांमध्ये मुलीच्या बेपत्ता होण्याच्या काही नोंदी होत्या का, ही माहिती घेतली जात आहे.
धर्मस्थळ प्रकरणाबाबत जनतेने तक्रारी नोंदवाव्यात यासाठी एसआयटीने दोन दिवसांपूर्वी एक हेल्पलाईन सुरू केली होती. एसआयटीने उघडलेल्या हेल्पलाईनवर सध्या शेकडो कॉल येत आहेत. केवळ राज्यातूनच नाही, तर बाहेरील राज्यांमधूनही यावर कॉल येत आहेत. बहुतेक लोक खटल्याच्या प्रगतीबद्दल माहिती विचारत आहेत. काही जण फोन करून सल्लाही देत आहेत. मात्र एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.