नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये विविध राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्याची कारवाई करण्याच्या सूचना देखील अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना दिल्या गेल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बुधवारी केंद्र सरकारने मोठी पावलं उचलत पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये ज्या पाकिस्तानी नागरीकांकडे सर्व आवश्यक मान्यता प्राप्त कागदपत्रे आहेत, त्यांना १ मे पर्यंत तर ज्यांच्याकडे सार्क व्हिसा आहे त्यांना ४८ तासात परत जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले होते.
पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे व्हिसाही रद्द केले होते. भारत सरकारच्या या निर्णयानंतर शुक्रवारी कोणत्या राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत, याची पडताळणी करा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवण्यासंबंधी कारवाई करा, अशा सूचना स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात विशेष व्हिसा किंवा इतर कारणांमुळे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची स्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातही दिसून येत आहे. सध्या बरेलीमध्ये विविध कारणांमुळे ३४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी ३३ नागरिकांकडे लॉन्ग टर्म व्हिसा आहे, तर शहनाज वेगम या विशेष उद्देशासाठी प्रवेश व्हिसावर भारतात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहनाज बेगम यांना ४८ तासांव भारत सोडावा लागणार आहे.
शहनाज बेगम या बरेलीच्या बारादरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या माळी खेडा भागात आपल्या माहेरी आल्या होत्या. त्या Special Purpose Entry Visa (SPEV) वर भारतात दाखल झाल्या होत्या. मात्र, रामपूरजवळ रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या पर्सची चोरी झाली, ज्यामध्ये पासपोर्ट, व्हिसा, पाकिस्तानी सिम कार्ड आणि रोकड होती. त्यांनी बरेली GRP पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही नोंदवली होती.