सर्वोच्‍च न्‍यायालयाने नीट पेपरफुटीबद्दल माहिती मागवली. Pudhari File Photo
राष्ट्रीय

'नीट' पेपरफुटी झाली हे निर्विवाद : सर्वोच्च न्यायालय

एनटीएकडून पेपरफुटी झालेल्या केंद्रांची माहिती न्यायलयाने मागवली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा कथित पेपरफुटी प्रकरणी सोमवारी (दि.8) सर्वोच्च न्यायालयात तब्बल 2 तास 20 मिनिटे सुनावणी झाली. नीट परीक्षेत पेपरफुटी झाली हे निर्विवाद असल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले. पेपरफुटीची व्यापकता जर मोठ्या प्रमाणात असेल, तर पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील असेही न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणी दरम्यान खंडपीठाने एनटीएसमोर प्रश्नांची सरबत्ती लावली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठांसमोर नीट कथित पेपरफुटी प्रकरणासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) पेपरफुटीचा फायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यास आणि याप्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत केलेल्या तपासाची माहिती देण्यास सांगितले आहे.

यावेळी न्यायालयाने एनटीएमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीबाबत केंद्र सरकारकडून माहिती मागवली आहे. याशिवाय फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून जास्तीत जास्त 10 पानांचा एकत्रित अहवाल मागवण्यात आला आहे. बुधवारी (दि.10) सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांनी आपले उत्तर सादर करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की 'पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची व्याप्ती किती मोठी आहे हा प्रश्न आहे. पेपरफुटी किती व्यापक आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे? केवळ दोन जणांच्या फसवणुकीमुळे संपूर्ण परीक्षा रद्द करता येणार नाही. पेपरफुटीच्या आरोपींना ओळखण्यासाठी एनटीए आणि सरकारने आतापर्यंत काय केले, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.

सुनावणी दरम्यान, एनटीएला नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते केंद्रांना वितरित करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया न्यायालयाने विचारून घेतली. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्हाला नेमकी तारीख जाणून घ्यायची आहे की प्रश्नपत्रिका कधी तयार झाली? ती संस्थेकडे कधी पाठवली गेली? प्रश्नपत्रिका छापणारा छापखाना कोणता आहे? छापखान्यात पाठवण्याची काय व्यवस्था करण्यात आली? छापखान्याचा पत्ता सांगू नका, नाहीतर पुढच्या वर्षी दुसरा पेपर फुटेल. असे म्हणत त्यांनी एनटीएसमोर प्रश्नांचा भडिमार केला. तर नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी झाल्याचे एनटीएने मान्य केले असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सर्वोच्च न्यायालयात ३८ याचिकांवर एकाच वेळी सुनावणी सुरू

सर्वोच्च न्यायालय नीट कथित पेपरफुटी प्रकरणी एकाच वेळी 38 याचिकांवर सुनावणी करत आहे. त्यापैकी 34 याचिका विद्यार्थी, शिक्षक आणि कोचिंग संस्थांनी दाखल केल्या आहेत, तर 4 याचिका एनटीएने दाखल केल्या आहेत.

उन्हाळी सुट्ट्यानंतर पहिल्याच दिवशी महत्वाच्या याचिकांवर सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाला 20 मे पासून 7 जुलैपर्यंत उन्हाळी सुट्ट्या होत्या. सोमवारी उन्हाळी सुट्ट्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पूर्णवेळ कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, संदेशखाली प्रकरण यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणी याचिकांवर सुनावणी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT