राष्ट्रीय

Ujjain Shahi Masjid row : उज्जैनमधील 'शाही मशीद' पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

रस्ता रुंदीकरणासाठी मशीद प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात झालेल्या तडजोडीची न्यायालयाने घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

Ujjain Shahi Masjid row : रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पासाठी उज्जैन शाही मशिदीचा काही भाग पाडण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आज निकाली काढली. मशीद प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात झालेल्या तडजोडीची न्यायालयाने दखल घेतली आहे. दरम्‍यान, तत्पूर्वी, रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा काही भाग पाडण्याच्या प्रस्तावाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या जमावाने दगडफेक केली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, ज्यामुळे शहरातील त्या भागात तणाव निर्माण झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेची कारवाई उच्‍च न्‍यायालयाने ठरवली योग्‍य

शाही मशिदीबाबत उज्जैन महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला योग्य ठरवत, उच्च न्यायालयाने मुस्लिम बाजूने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (इंदूर खंडपीठ) न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर आणि न्यायमूर्ती जय कुमार पिल्लई यांच्या खंडपीठाने दुपारच्या सत्रानंतर या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि मशीद पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. यासंदर्भातील सविस्तर आदेश आज संध्याकाळी उशिरा जारी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून सौम्‍य बळाचा वापर

कांथल चौक ते गोपाल मंदिर या मार्गाचे १५ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत, प्रस्तावित मार्गाच्या (अलाइनमेंट) कक्षेत येणाऱ्या बांधकामांचे स्थलांतर किंवा त्यात बदल करणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि अखेरीस त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला.

अफवाकडे दुर्लक्ष करण्‍याचे प्रशासनाचे आवाहन

उज्जैन प्रशासन आणि शहर काझी यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशन सिंह यांनी सांगितले की, 'सिंहस्थ कुंभ'साठी येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या संख्येची सोय करण्यासाठी बांधकाम सुरू आहे आणि त्याच योजनेनुसार रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. तसेच, सर्वधर्मीय नागरिकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य आणि योगदान दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT