UAE Flight Restrictions
दुबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये विमान वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा मोठा फटका भारतीय प्रवाशांना बसला असून, एअर इंडियाने (Air India) रविवारी आपल्या अनेक विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत, तर इंडिगोने (IndiGo) विमान प्रवासाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.
UAE विमानतळ प्राधिकरणाने विमान कंपन्यांना त्यांचे उड्डाणे कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात 'X' वर माहिती देताना एअर इंडियाने म्हटले की, "UAE कडून प्राप्त झालेल्या ताज्या सूचनांनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसला १५ मार्च २०२६ रोजीच्या आपल्या तात्पुरत्या (Ad-hoc) विमानफेऱ्या कमी कराव्या लागत आहेत."
दिल्ली-दुबई: एअर इंडिया आज (दि. १५ मार्च) दिल्ली-दुबई मार्गावर केवळ एकच परतीची विमानफेरी चालवणार आहे. नियोजित ५ विमानफेऱ्यांपैकी ४ रद्द करण्यात आल्या आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसकंपनीच्या ६ पैकी ५ दुबई विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून केवळ एकच दिल्ली-दुबई विमानफेरी सुरू राहील.
शारजाहून दिल्ली, कन्नूर, कोची, कोझिकोड, मुंबई आणि तिरुवनंतपुरमसाठी विमानफेऱ्या सुरू ठेवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. तसेच, स्लॉट उपलब्धतेनुसार रास अल खैमाह ते कोझिकोड आणि कोची सेवा चालवल्या जातील. ज्या प्रवाशांची विमाने रद्द झाली आहेत, त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुढील तारखेचे तिकीट बुक करण्याचा किंवा पूर्ण परतावा घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
इंडिगोनेही प्रवाशांना दुबईतील निर्बंधांबाबत सतर्क केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, "मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीमुळे दुबईतील विमान वाहतुकीवर निर्बंध आले असून वेळापत्रकात बदल झाले आहेत. प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या विमानाची स्थिती (Flight Status) तपासून घ्यावी."
पश्चिम आशियातील या संकटामुळे केवळ वाहतुकीवरच परिणाम झाला नाही, तर विमान इंधनाच्या (ATF) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. वाढता खर्च भरून काढण्यासाठी इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर यांसारख्या कंपन्यांनी आधीच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर 'फ्यूल सरचार्ज' लागू केला आहे.